कार्तिकी वारी १ डिसेंबरपासून

कार्तिकी वारी १ डिसेंबरपासून
Published on: 

आळंदी, ता. ९ : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आळंदीतील देऊळवाड्याच्या गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने मंगळवारी (ता. १ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. सोहळ्यातील कार्तिकी एकादशीची मुख्य पहाट पूजा शुक्रवारी (ता. ४ डिसेंबर) तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा रविवारी (ता. ६ डिसेंबर) होणार आहे.
पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या कुटुंबीयांच्या वतीने मंगळवारी (ता. १ डिसेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने महाद्वारामध्ये कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ होईल. दोन व तीन डिसेंबरला पहाटे पाच ते सकाळी ११ पर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. त्यानंतर कार्तिकी एकादशीला ४ डिसेंबरला माउलींच्या संजीवन समाधीवरील पहाट पूजेसाठी मध्यरात्रीपासूनच अकरा ब्रह्मवृंदांच्या साथीत पौरोहित्य सुरू होईल. पहाट पूजेनंतर भाविकांच्या महापूजा बंद ठेवण्यात येणार असून समाधी मंदिर दिवसभर दर्शनासाठी भाविकांना खुले राहील. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याच्या बाहेर पडेल. त्यानंतर पालखी रात्री नऊ वाजता मंदिरात परंपरेनुसार परतल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि त्यानंतर धूपारती होईल.
द्वादशीनिमित्त शनिवारी (ता. ५ डिसेंबर) प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पहाट पूजा साडेतीनच्या सुमारास होणार आहे. त्यानंतर मुक्ताबाई मंडपामध्ये काकडा भजन होईल. पहाटे पाच ते सकाळी साडेअकरापर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. या पूजा माउलींच्या पादुकांवर होतील. त्यानंतर दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सवासाठी माउलींची पालखी नगरप्रदक्षिणा होणार आहे. पालखी मंदिरात आल्यानंतर रात्री अकरा वाजता फडकरी, दिंडीकरी, मानकरी यांना देवस्थानच्या वतीने नैवेद्य प्रसाद देण्यात येणार आहे.
रविवारी (ता. ६ डिसेंबर) पहाटे तीन ते चार यावेळेत प्रमुख विश्वस्त डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पवमान अभिषेक, दुधाचा अभिषेक झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी पाच ते साडेनऊ माउलींच्या पादुकांवर भाविकांच्या पूजा होतील. सकाळी सात ते नऊ महाद्वारात हैबतबाबांच्या पायरीपुढे कीर्तन तर वीणा मंडपामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सकाळी नऊ ते बारापर्यंत वीणा मंडपामध्ये संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या वतीने माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन होईल. बारा वाजता संजीवन समाधी दिन साजरा होणार आहे. तर मंगळवारी (ता. ८ डिसेंबर) रात्री माउलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा आणि छबिना मिरवणुकीने कार्तिकी वारी सोहळ्याची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.