संत गाडगे बाबांनी शंभर वर्षांपूर्वी पहिली धर्मशाळा पंढरपुरात उभारली
गाडगेबाबांचा फोटो वापरावा
पंढरपुरातील संत गाडगेबाबांची स्वच्छतेची परंपरा आजही जिवंत
जयंती विशेष : शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या धर्मशाळेत यात्रेकरूंना सुविधा
भारत नागणे, सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २२ : संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी पंढरपुरात स्वच्छतागृहयुक्त धर्मशाळा उभारून सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. आजही पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील गाडगे महाराज मराठा धर्मशाळेत यात्रेकरूंना, विशेषतः महिलांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते.
२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबांची १५० वी जयंती साजरी होत असून, त्यांच्या कार्याच्या आठवणी आजही पंढरपूरकरांच्या मनात जिवंत आहेत. स्वच्छता, समाजसेवा आणि शिक्षण या क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
संत गाडगे बाबा (डेबुजी झिंगराजी जानोरकर) यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी दर्यापूर तालुक्यातील शेलगाव येथे झाला. १९०५ पासून त्यांचे पंढरपूरशी ऋणानुबंध जुळले. १९२० मध्ये त्यांनी मराठा धर्मशाळेची स्थापना करून यात्रेकरूंना निवास व भोजनाची व्यवस्था केली. स्वातंत्र्यसैनिकांसाठी तळघराचीही सुविधा येथे करण्यात आली होती.
मुक्या प्राण्यांप्रती असलेल्या प्रेमातून त्यांनी गोशाळा सुरू केली. आजही धर्मशाळेच्या माध्यमातून गोरक्षण केले जाते. तसेच गरीब मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहाची व्यवस्था केली. १९३४ मध्ये त्यांनी संत चोखामेळा यांच्या नावाने गोपाळपूर रोडवर धर्मशाळा सुरू केली.
सामाजिक समतेच्या कार्यातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेसाठी गौतम विद्यालयाकरिता दोन एकर जागा तसेच शेतीसाठी ३८ एकर जमीन दिली. परीट समाजासाठीही १२ गुंठे जागेत स्वतंत्र धर्मशाळा उभारण्यात आली. तर सखूबाई कन्या प्रशालाही त्यांच्या काळत सुरु झाली. अशा प्रकारे संत गाडगे बाबांनी पंढरपुरात तीन धर्मशाळा व मुलींच्या शिक्षणासाठी संस्था उभारल्या. आज मितीस संत गाडगे बाबांच्या पंढरपुरातील विविध धर्मशाळांबरोबच ४० एकर जमीन आहे. कैकाडी महाराज, संत तनपुरे महाराज, मनमाडकर महाराज, शिरकर महाराज आदी संत गाडगे बाबांचे अनुयायी होते.
सध्या मराठा धर्मशाळेसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असून त्यामुळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांवर परिणाम होत आहे. शासनाने या वादावर तोडगा काढून संस्थेच्या कार्याला गती द्यावी, अशी मागणी गाडगे बाबांचे अनुयायी व धर्मशाळेचे व्यवस्थापन पाहणारे राधेश बादले-पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

