संत तुकाराम कारखाना निवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला

Sant-Tukaram-Sugar-Factory
Sant-Tukaram-Sugar-Factory

वडगाव मावळ - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी (ता. १६) होत आहे. पंचवीस वर्षे कारखान्याचे नेतृत्व करणारे विद्यमान अध्यक्ष विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय पॅनेलविरुद्ध स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरलेले इच्छुक असे लढतीचे स्वरूप आहे. शेतकरी नवलेंच्या कारभारावर शिक्कामोर्तब करणार की स्वतंत्र उमेदवार सर्वपक्षीय पॅनेलला शह देऊन कारखान्यात शिरकाव करण्यात यशस्वी होणार, याबाबत उत्सुकता आहे.

पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या चारही निवडणुका बिनविरोध झाल्या; परंतु गेल्या वेळी सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल व जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनेल अशी लढत झाली होती. परिवर्तन पॅनेलने सतरा जागांवर उमेदवार उभे केले होते. त्या निवडणुकीत नवले यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले होते. या वेळी अखेरपर्यंत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले; परंतु यश आले नाही.

एकवीसपैकी सोमाटणे-पवनानगर गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या, अठरा जागांसाठी २९ उमेदवार आहेत. सर्वपक्षीय पॅनेलविरुद्ध स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरलेले सर्वच पक्षांतील ‘इच्छुक’ असे लढतीचे स्वरूप आहे. 

हिंजवडी-ताथवडे गटात नवले यांच्यासह बाळासाहेब बावकर व तुकाराम विनोदे हे सर्वपक्षीय पॅनेलचे उमेदवार असून, पांडुरंग राक्षे स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. पौड-पिरंगुट गटातील तीन जागांसाठी अंकुश उभे, दिलीप दगडे व महादेव दुडे हे सर्वपक्षीय पॅनेलचे, तर माजी खासदार अशोक मोहोळ यांचे चिरंजीव संग्राम मोहोळ स्वतंत्र उमेदवार आहेत. 

तळेगाव-वडगाव गटातील तीन जागांसाठी विद्यमान उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माउली दाभाडे व शिवाजी पवार हे सर्वपक्षीय पॅनेलचे, तर बाळासाहेब नेवाळे, तुकाराम नाणेकर व पंढरीनाथ ढोरे हे स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. ढोरे यांनी नंतर सर्वपक्षीय पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. खेड-शिरूर-हवेली गटातील प्रवीण काळजे, मधुकर भोंडवे व अनिल लोखंडे हे सर्वपक्षीय पॅनेलचे, तर अरुण लिंभोरे स्वतंत्र उमेदवार आहेत. महिला राखीव गटातील दोन जागांसाठी शुभांगी गायकवाड व ताराबाई सोनवणे या सर्वपक्षीय पॅनेलच्या, तर रूपाली दाभाडे या स्वतंत्र उमेदवार आहेत. 

अनुसूचित जाती जमातीच्या जागेसाठी बाळू गायकवाड हे सर्वपक्षीय पॅनेलचे, तर सखाराम गायकवाड स्वतंत्र उमेदवार आहेत. इतर मागास प्रवर्ग जागेसाठी चेतन भुजबळ हे सर्वपक्षीय पॅनेलचे, तर अरुण लिंभोरे स्वतंत्र उमेदवार आहेत. भटक्‍या विमुक्त प्रवर्ग जागेसाठी बाळकृष्ण कोळेकर हे सर्वपक्षीयचे, तर शिवाजी कोळेकर व सुरेश जाधव हे स्वतंत्र उमेदवार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com