

धरा पंढरीची वाट ।
भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवता आहेत, त्यांची वेगवेगळ्या स्वरूपाची उपासना अनेक मार्गाने करण्याची परंपरा आहे. पण, या सगळ्यांमुळे बऱ्याचदा ‘बहुदेवता उपासना पद्धती’ समाजात निर्माण होते आणि त्यातून एकही उपासना धड होत नाही, समाज संभ्रमित होतो. यावर संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेव-नामदेवराय-एकनाथरायांनी प्रवृत्त केलेल्या एकविध उपासनेवर भर दिला.
- पराग महाराज चातुर्मासे, पंढरपूर
व्यक्तिगत कल्याणाबरोबर समाजकल्याण साधणे हे भक्ती या साधनपरंपरेचे वैशिष्ट्य आहे. पुरातन काळापासून भारतीय परंपरेत भक्तीचा जो विचार आलेला आहे, तो सकल विश्वाच्या कल्याणाची भूमिका घेऊनच. गीता व श्रीमद् भागवतात अनेक ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने ही भूमिका मांडली आहे. ज्या जीवांना आधाराची आवश्यकता आहे, जे रंजलेले, गांजलेले संसाराच्या दुःखात त्रस्त झालेले आहेत अशांनाही ‘भक्तीने’ समाधान प्राप्त होते. भागवतात एकादश स्कंधात संदर्भ येतो की,
सुग्रीवो हनुमान् ऋक्षो गजो गृध्रो वणिक्पथः ॥
व्याधः कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्न्यस्तथाऽपरे ।।
ते नाधीत श्रुतिगणा नोपासीत महत्तमाः ।
अव्रतातप्त तपसः सत्संगान्मामुपागताः ॥
केवलेनहि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः ।
येऽन्ये मूढधियो नागाः सिद्धमामीयुरञ्जसा ॥
भगवान उद्धवाला म्हणतात, ‘‘सुग्रीव, हनुमंत, जांबुवंत, गजेंद्र, जटायु, तुलाधार, वैश्य, व्याध, कुब्जा, गोपी यज्ञपत्न्या हे सगळे भक्तीबलाने उद्धरून गेले. या सगळ्यांनी कधी कुठले वेदाध्ययन केले नाही, ना कुठली खडतर तपश्चर्या.. सहज उद्धार हे जणू भक्ती परंपरेचे वैशिष्ट्यच आहे. वारकरी परंपरेने सुद्धा हाच विचार अंगीकारून ‘याता-याती धर्म नाही विष्णूदासा ।
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री।।’
म्हणत सर्वसमावेशक भेदभाव विरहित भक्ती केली. जगद्गुरू तुकोबाराय या परंपरेचे कळस आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक प्रखरतेने भक्ती परंपरा समाजाभिमुख केली. त्यांनी तत्कालीन प्रचलित व्यवस्थेतील अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने विचार प्रतिपादित केले. तुकाराममहाराजांनी तत्कालीन समाजात रूढ झालेल्या अंधश्रद्धेवर आपल्या शब्दांच्या माध्यमातून जागरण केले त्याची काही उदाहरणे सांगता येतील.
१. ‘नवस केल्याने मूल होईल’ अशी एक भ्रामक समजूत आजच्या काळातही समाजात रूढ आहे. तुकोबारायांनी सतराव्या शतकात ‘नवसे कन्यापुत्र होती। तरी का करणे लागे पती ।।’ असे म्हणत थेट सवाल अशी समजूत असणाऱ्यांना केला आहे.
२. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देवता आहेत, त्यांची वेगवेगळ्या स्वरूपाची उपासना अनेक मार्गाने करण्याची परंपरा आहे. पण या सगळ्यांमुळे बऱ्याचदा ‘बहुदेवता उपासना पद्धती’ समाजात निर्माण होते आणि त्यातून एकही उपासना धड होत नाही, समाज संभ्रमित होतो. यावर तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेव-नामदेवराय-एकनाथरायांनी प्रवृत्त केलेल्या एकविध उपासनेवर भर दिला. संत तुकाराम महाराज म्हणाले -
‘‘शेंदरी हेंदरी दैवत। कोण पूजी भुते खेते ।
आपुल्या पोटा जी रडते। मागती शिते अवदान।।’’
आजही गावखेड्यात कुठेही शेंदूर फासलेल्या दगडांना लोक पूजतात आणि त्यासंबंधी एक प्रकारची भीती असते की या देवाचा कोप होईल. कोण्या प्राण्याचा बळी दिला गेला नाही, तर तो देव हानी पोचवेल. तुकोबारायांनी मात्र थेट असल्या कोणतीही परंपरा नसलेल्या आणि अंधश्रद्धेने मोठ्या झालेल्या देवांना, पोटासाठी रडणाऱ्या देवांना ‘हेंदरे’ म्हणत समाज जागरण केलेले दिसते. महाराजांनी नुसते जागरण केलेले नाही तर, या सगळ्यात माणसांच्या हितासाठी साधन सुद्धा दिलेय ते कोणते?
महाराज म्हणाले,
‘‘करा करा लागपाठ। धरा धरा पंढरीची वाट।।
जव नाही चपेट। घात पडीला काळाचा ।।’’
‘‘काळाने घात करण्याच्या आधी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वाटेने तुम्ही जा. पंढरपूरच्या विठोबाची भक्ती करा,’’ असाच संदेश महाराजांना द्यायचा आहे. कारण तुकोबाराय स्वतः या विठोबाच्या वाटेवर स्थित असल्याने महाराज तोच विठोबाच्या एकविध भक्तीचा उपदेश समाजाला करतात.
३. तुकाराम महाराजांना एकदा कोणी एक व्यक्ती भेटली, की जो धर्माने मुस्लिम होता आणि त्याला मद्यप्राशनाचे व्यसन होते. महाराजांनी त्याची ती अवस्था पाहिली आणि त्याच्या एकूण अवस्थेवर दया येऊन त्याच्या भाषेत महाराजांनी त्याला समजून सांगण्यासाठी अभंग लिहिला त्यालाच ‘वैद्यगोळी’ म्हटले जाते. तो अभंग असा आहे -
‘‘अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारू अल्ला खिलावे ।।
अल्ला बगर नही कोये । अल्ला करे सो हि होये॥
मर्द होये वो खडा फीर । नामर्दकुं नहीं धीर ।
आपने दिलकुं करना खुसी । तीन दामकी क्या खुमासी ॥
सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार ।।
इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥’’
महाराज त्याला म्हणाले, ‘‘अरे बाबा, तुला देणारा खाऊ-पिऊ घालणारा अल्ला म्हणजेच देव आहे त्याच्याशिवाय कोणीही कर्ता-धर्ता नाही. म्हणून जो खरा पुरुष आहे तो कधीच असले अपेयपान करणार नाही. या गोष्टी नामर्दच करू शकतात. त्यामुळे माझ्याकडे एक गोळी आहे की ज्या गोळीने सर्व पीडा दूर होतात, ती गोळी म्हणजे भजनगोळी आहे. म्हणून त्याच्या भजनाची गोळी तू घे त्याने सगळ्या पीडा दूर होतात.’’ तुकोबारायांनी या संपूर्ण अभंगात त्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला ‘अधिकार तैसा करू उपदेश’ या न्यायाने हिंदी भाषेतून अभंग रचना करून हरिभक्तीचा उपदेश केलाय. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्याला सन्मार्ग दाखविण्याचा तुकोबारायांच्या स्वभावाचे दर्शन यातून होते.
४. तुकोबारायांच्या अभंग गाथेत ‘पाईकीचे अभंग’ म्हणून ११ अभंगांचे प्रकरण आलेले आहे. या अभंगांत राजाचा पाईक अर्थात सैनिक कसा असावा, याचे विवेचन केलेले आहे. हे अकरा अभंग म्हणजे जणू छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांना प्रेरणा देण्यासाठी तुकोबारायांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाच आहेत . या सूचनांवरच स्वराज्य उभे राहिले असे म्हणणे वावगे ठरत नाही.
भक्ती केंद्रास्थानी ठेवून जगद्गुरू तुकोबारायांनी सकल समाजाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. पण आजच्या समाजाचे दुर्दैव असे आहे की, आजही या महाराष्ट्रातील सामाजिक समस्या संपलेल्या नाहीत. आजही इथे भोंदूगिरी, बुवाबाजी, व्यसनाधीनतेसारखे प्रकार रोज सर्रास घडतायेत. दर महिन्याला येथे कुठूनतरी एक नवीन बाबा लोक शोधतात आणि त्याच्यामागे समाज जातो हे आजचे वास्तव आहे. येथील राजकारणातील स्वामीनिष्ठेबद्दल तर बोलायलाच नको. आजच्या बदलत्या काळात सुद्धा संतांचे ज्ञानोबा-तुकोबारायांचे विचारच योग्य मार्ग दाखवतात, हे इथल्या समाजाने लक्षात घेऊन शांतपणे डोळस होऊन संतांच्या मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.