स्वागत नव्या पुस्तकाचे

स्वागत नव्या पुस्तकाचे
Published on

स्वागत नव्या पुस्तकांचे

संत वाङ्‍मयातील अध्यात्म आणि विज्ञान

‘संत वाङ्‌मयातील अध्यात्म आणि विज्ञान’ हे श्री. ग. शां. पंडित यांचे छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण पुस्तक वाचकांच्या भेटीस आले आहे. पुस्तकात लेखकाने अध्यात्म आणि विज्ञानाची सविस्तर मांडणी केली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी कर्मकांड आणि अंधश्रद्धांच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला आपल्या अभंगांद्वारे आणि कीर्तन-प्रवचनांद्वारे खडबडून जागे करण्याचे मोठे कार्य संतांनी केले, प्रबोधनाचे कार्य चालू ठेवले. अशा विविध संतांच्या प्रागतिक किंवा विज्ञाननिष्ठ विचारांचा परामर्श लेखकाने घेतला आहे. ज्ञानेश्‍वरीतील विज्ञान व अध्यात्म, पसायदान ही स्वतंत्र प्रकरणे वाचनीय आहेत.

वैशिष्ट्य : रसाळ भाषाशैली. उपयुक्त संदर्भसूची.
प्रकाशक : अनाहत प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १०४, मूल्य : १५० रु.
----
प्रवासरंग

वेगवेगळे देश फिरण्याचा छंद असलेल्या श्वेता चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘प्रवासरंग’ ही अनुभवगाथा आहे. स्वतः प्रवासाची आखणी करून, त्या त्या देशाच्या नकाशांच्या आधारे त्यांनी अर्धे जग पाहिले आहे. स्वतः आखून केलेल्या प्रवासामुळे मानसिक समाधान मिळते आणि आर्थिकदृष्ट्याही ते कसे फायदेशीर ठरते, याविषयीही त्यांनी या पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. विविध देशांमधील पर्यटनस्थळे, संस्कृती, महत्त्वाच्या वास्तू, चित्रप्रदर्शन, पुस्तकांची दुकाने, खाद्यपदार्था यांसह प्रवासासाठी काय तयारी करावी, याचीही माहिती पुस्तकातून मिळते. फिनलँड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, रशिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, इंग्लड अशा विविध देशांची माहिती या लेखनातून मिळते.

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : १७६, मूल्य : ३०० रु.
----
गोष्ट त्यांची ऐका

‘गोष्ट त्यांची ऐका...’ हा वर्षा गजेंद्रगडकर यांचा काव्यसंग्रह म्हणजे बालकुमारांना डोळ्यांसमोर ठेवून केलेला एक वेगळा प्रयोग आहे. बीजसंवर्धन हे एकच सूत्र घेऊन, केलेल्या या कविता मुलांना सजीवसृष्टीचं रहस्य सांगणाऱ्या आणि ‘सृष्टी राखायची तर मुळात बीज राखायला हवं’, हा संदेश रसाळ पद्धतीने देणाऱ्या आहेत. संग्रहात एकूण ३० कविता आहेत. या रचनांमध्ये ‘फँटसी’ आहे, तसं वैज्ञानिक वास्तवही आहे. बीजसंवर्धन आणि बियांच्या प्रसारामुळे वाढणारी हिरवाई, त्यामुळे निर्माण होणारं जैववैविध्य, या सगळ्याचं महत्व बालकुमारांना त्यांच्या भाषेत समजावून सांगणारं हे पुस्तक मुलांसह शिक्षक-पालकांनीही आवर्जून वाचावं.

वैशिष्ट्य : भारत सासणे यांची प्रस्तावना. संतोष घोंगडे यांचे उत्कृष्ट मुखपृष्ठ व चित्रे.
प्रकाशक : अभिजित प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ५६, मूल्य : १९० रु.
----

Marathi News Esakal
www.esakal.com