‘सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathon

पुण्यातील सरहद्द संस्थेच्यावतीने कारगिलमध्ये येत्या १९ सप्टेंबरला ‘सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन

पुणे - पुण्यातील सरहद्द संस्थेच्यावतीने कारगिलमध्ये येत्या १९ सप्टेंबरला ‘सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे (Sarhad Kargil International Marathon Competition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, यामध्ये जगातील सुमारे २० देशांमधील स्पर्धक सहभागी होणार आहेत. याशिवाय लडाख पोलिस लष्कर आणि निमलष्करी दलातील सुमारे ३०० धावपट्टू सहभागी होणार आहेत.

यंदाची ही सरहद्दची पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आहे. याआधी चार स्पर्धा कारगिलमध्ये घेण्यात आल्या. मात्र या सर्व स्पर्धा राष्ट्रीय होत्या. कोरोनामुळे या चारपैकी एक स्पर्धा व्हर्चुअल तर, एक सिंबालिक स्वरूपात घेण्यात आली. यंदाची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ही लडाख पोलिस, लडाख ॲटॅनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल कारगिल आणि कारगिल जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असल्याचे या स्पर्धेचे मुख्य समन्वयक डॉ. शैलेश पगारिया आणि सदस्य सचिव व सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी सोमवारी (ता.९) पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी या स्पर्धेचे समन्वयक युवराज शहा, कारगिल-पुणे आॅर्चरी ॲकॅडमीचे वैभव वाघ, जगभरातील ६४ देशांतील विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या अॅक्टा (aktta) या संघटनेचे अध्यक्ष मोहाद अली, स्पर्धा संचालक वसंत गोखले, स्पर्धेचे तांत्रिक व्यवस्थापक सुमंत वायकर, वलि रहमानी आणि सचिन जामगे आदी उपस्थित होते. पगारिया म्हणाले, ‘‘यासाठी मोफत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नोंदणीची मुदत संपण्यापूर्वीच यासाठी देशभरातून दोन हजार जणांनी नोंदणी केली आहे. कारगिलमध्ये निवासाची क्षमता असलेल्या संख्येहून अधिक ही नोंदणी झाली आहे. शिवाय पुणे शहरात राहत असलेले अफगाणिस्तान, केनिया, बांगलादेश, नेपाळ आणि आफ्रिकेसह २० देशांमधील धावपट्टू व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.’’

संजय नहार म्हणाले, ‘‘या स्पर्धेसाठी आवश्‍यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. तसेच ॲथलेटिक फेडरेशन आॅफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. यासाठी आॅल कारगिल ट्रॅव्हल ॲण्ड टुरिस्ट असोसिएशन आणि कारगिल ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि लेह या केंद्रशासित प्रदेशच्यावतीने जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर होणारी ही जगातील महत्त्वाची मॅरेथॉन स्पर्धा ठरणार आहे.विजेत्यांना आठ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला जाणार आहे.’’

‘रन फॉर ॲप्रीकॉट’

यंदाच्या या आंतरराष्ट्रीय मॅरोथॉन स्पर्धेची संकल्पना ही ‘रन फॉर ॲप्रीकॉट’ अशी ठेवण्यात आली आहे. ॲप्रीकॉट हे स्थानिक फळ आहे. आपल्याकडे याला जर्दाळू म्हणतात. केंद्र सरकारने एक जिल्हा एक उत्पादन संकल्पना सुरु केली आहे. यानुसार या जिल्ह्याची निवड ॲप्रीकॉटचा जिल्हा म्हणून केली आहे. तेथील स्थानिक फळांचे उत्पादन हे जगभर जावे, या उद्देशाने ही संकल्पना निश्चित केली असल्याचे डॉ. शैलेश पगारिया आणि संजय नहार यांनी सांगितले.

Web Title: Sarhad Kargil International Marathon Competition Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneCompetition
go to top