
पुणे : बीड जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाला जन्मापासूनच थेंब-थेंब लघवी व्हायची. काही दिवसांनी त्याला वारंवार ताप येणे आणि लघवीतून पू येणे अशी लक्षणे दिसू लागली. पालकांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्यावर मुलाला ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले. ससूनच्या पेडीयाट्रीक सर्जरी विभागातील शल्यविशारदांनी सिस्टोस्कोपीबरोबर लेझरचा वापर करून मूत्रमार्गातील झडपेसारखा पडदा दूर करण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. मूत्रमार्गातील पडद्याचा अडथळा दूर झाल्याने बाळाची लघवीची समस्या दूर झाली आहे.