सासवड : संत सोपानदेव पंढरीकडे मार्गस्थ

सलग दुसऱ्या वर्षी प्रस्थानानंतर 17 दिवसांचे होम क्वारंटाईन संपवून पादुका माहेरी -
सासवड : संत सोपानदेव पंढरीकडे मार्गस्थ

सासवड : कऱ्हा नदी व चांबळी नदी यांच्या काठी पावसाची रिमझिम..सोबतच हरीनामाचा वर्षाव...रांगोळ्यांच्या पायघड्या..वरून होणारी पुष्पवृष्टी., यातच वारकरी व भक्त लोकांचा भक्तिरंग.. पाणावलेल्या नेत्राचा लोकरंग या उत्साही वातावरणात संत सोपानदेव महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी मार्गस्थ झाल्या. प्रस्थान सोहळा झाल्यानंतर सुद्धा तब्बल 17 दिवस जणू 'होम कोरंटाईन' सोपान देव होते. आज खऱ्या अर्थाने माहेर पंढरीला त्यांच्या पादुका पोहोचल्या.

पालखीतील चल पादुका देव संस्थानचे विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख अँड. त्रिगुन गोसावी यांनी आणून एसटीच्या बसमध्ये आसशनावर ठेवल्या. संत सोपानदेव समाधी मंदिराच्या देऊळवाड्यात आजच्या पंढरीकडे मार्गस्थ होण्याच्या सोहळ्याला पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप, सासवडचे प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष वसुधा आनंदे, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील राहुल घुगे आदी उपस्थित होते.

संत सोपानदेवांचा पंढरीकडे आषाढी वारीचा प्रस्थान सोहळा झाल्यापासून पालखी, पादुका व निवडक वारकरी येथील मंदिर व देऊळवाड्यातच होते. पालखी वाटचालीत बारामतीच्या पुढे पिंपळी लिमटेक येथे सोपानदेवांसमोर बकरी रिंगण होत असते, तेही प्रातिनिधीक स्वरुपात सासवडला समाधी मंदिराच्या सानिध्यात व देऊळवाड्यात करुन लोकरंग व भक्तीरंगाचा मिलाप येथे झाला होता.

आज पादुका घेऊन एसटी बसेस निघताना... टाळ - मृदंगाचा निनाद आणि निवडक दिंड्या - वारकरी यांची उत्साही उपस्थिती.. ढगाळ वातावरण व मंद वाऱयाच्या झुळका अंगावर झेलत... लोकरंग व भक्तीरंगात., श्री.संत सोपानदेवांचा हा मार्गस्थ सोहळा जणु रंगला. दोन बसेस, एक जादा बस, दुरुस्ती वाहन, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, पोलीस व प्रशासकीय पथक सोबत आहे. दरम्यान लगतच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून आमदार संजय जगताप यांच्या हस्ते आरती करीत श्री चांगवटेश्वर पालखीचे प्रस्थान असेच दोन एसटी बस मधून झाले. प्रत्येक पालखीचे चाळीस वारकरी प्रतिनिधी समवेत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com