सासवडमधील महामार्गावर वाहने सुसाट
सासवड, ता. ६ : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी सासवडमधील (ता. पुरंदर) रस्ते चकाचक करण्यात आले. मात्र, याच स्पर्धेच्या निमित्ताने काढलेले गतिरोधक दीड महिना उलटूनही पुन्हा न बसवल्याने सासवडकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनांच्या वाढत्या वेगामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.
सासवड शहरातून जाणाऱ्या पालखी महामार्गालगत वाघिरे महाविद्यालय, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, वाघिरे हायस्कूल आणि पुरंदर हायस्कूल यांसारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय विविध शासकीय कार्यालये, बँका, दवाखाने आणि मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या याच रस्त्यालगत आहेत. दररोज हजारो विद्यार्थी आणि नागरिक या मार्गावरून ये- जा करतात. मात्र, गतिरोधक नसल्याने वाहनचालक या परिसरातून अत्यंत वेगाने वाहने चालवत आहेत.
सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणाने जुने गतिरोधक काढून त्याऐवजी आता केवळ पांढरे पट्टे (रंबलर्स) मारले आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे पट्टे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी पुरेसे नसल्याचे चित्र आहे. अनेक वाहनचालक या पट्ट्यांकडे दुर्लक्ष करून सुसाट वेगाने जात असल्याने, शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाल्यांना शाळेत सोडताना भीती वाटत असल्याची भावना पालक जितेंद्र जगताप आणि चेतन महाजन यांनी व्यक्त केली. लवकरात लवकर हे गतिरोधक बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी पालक आणि नागरिकांमधून होत आहे.
अशा ठिकाणी रंबलर्स मारले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक करता येत नाहीत. तरीही या ठिकाणी शाळा असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गतिरोधक असणे अत्यंत आवश्यक आहे, अशी स्थानिक पोलिसांकडून पत्राद्वारे महामार्ग प्राधिकरणाला शिफारस करणे आवश्यक आहे.
- अभिजित औटी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
06519
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

