

व्यावसायिकाची २९ लाख रुपयांची फसवणूक
सातारा, ता. ६ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत साताऱ्यातील एका व्यावसायिकाची २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किशोर विजयकुमार कदम (रा. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी दीपक विठ्ठल गाडगीळ (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक लाभ मिळेल, असा विश्वास संशयित आणि दिला होता. त्यानुसार मी पत्नी माझा भाऊ व दोन मित्रांनी एकूण २९ लाख रुपये गुंतवले, ते संशयितांनी परत न देता फसवणूक केल्याचे गाडगीळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गाडगीळ यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार बागवान करीत आहेत.
..........
गांजाप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा
सातारा, ता. ६ : शहरातील शनिवार पेठ परिसरात एका घरात विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याप्रकरणी दोन महिलांवर एनडीपीएस कायद्यान्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायरा ख्वाजा खान (रा. पेठ, सातारा) व अमिना समीर मुजावर (वय ४०, रा. पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक सुधीर बनकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयितांकडून पिवळ्या प्लॅस्टिक पिशवीत तसेच लहान-लहान प्लॅस्टिकच्या पुड्यांमध्ये ठेवलेला एकूण १६७ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे १४ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक गोसावी करत आहेत.
.........
महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
सातारा, ता. ६ : शहर परिसरात एका महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी सुरेश कुंभार (रा. बाबर कॉलनी, सातारा) असे त्याचे नाव आहे. शहरातील एका किराणा दुकानासमोर ही घटना घडली. याबाबत संबंधित महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. हवालदार वरे तपास करत आहेत.
..........
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
सातारा, ता. ६ : शहर परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा छळ केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेहान कलाम अन्सारी (रा. मयूर कॉम्प्लेक्स, मल्हारपेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.
...........
शिवथरमध्ये एकावर कुऱ्हाडीने वार
सातारा, ता. ६ : शिवथर (ता. सातारा) जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष बाळकृष्ण चापेकर व श्रेयस संतोष चापेकर (दोघे रा. शिवथर, ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत नीलेश महेंद्र दयाळ (वय ३८, रा. करंजे पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. शिवथर येथील शेतात बांधण्याच्या तसेच जमिनीच्या वादातून संशयितांनी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत डोक्यात कुऱ्हाडीने वार केला तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे दयाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत, शिवीगाळ व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.