साताऱ्यात लवकरच धावणार ''सिटी बस''

साताऱ्यात लवकरच  धावणार ''सिटी बस''
Published on

साताऱ्यात लवकरच धावणार ‘सिटी बस’

‘सकाळ’च्या पाठपुराव्याला मोठे यश; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ‘सकाळ’ला माहिती

दहा मिनी ई-बस उपलब्ध होणार

राजेश सोळसकर : सकाळ वृत्तसेवा

​सातारा, ता. ३१ : सातारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘सिटी बस’सेवेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘सकाळ’ने याप्रश्नी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, साताऱ्यासाठी दहा मिनी ई-बस (इलेक्ट्रिक बस) उत्पादित करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परिवहनमंत्र्यांशी याबाबत यशस्वी चर्चा केली असून, लवकरच साताऱ्यात एसटी महामंडळामार्फत ई-बस धावणार असल्याची माहिती स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

​‘सकाळ’च्या मोहिमेची मंत्र्यांकडून दखल

गेल्या काही दिवसांपासून ‘सकाळ’ने साताऱ्यातील विस्कळित आणि बंद पडलेल्या शहर बससेवेचा प्रश्न लावून धरला होता. या मोहिमेला सातारकरांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील सर्वच सामाजिक संघटनांनी ‘सकाळ’च्या या भूमिकेला भक्कम पाठिंबा दिला. या जनभावनेची गंभीर दखल घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांची कात्रणे आवर्जून मागवून घेतली होती. हीच कात्रणे त्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडून साताऱ्यातील सिटी बसची नितांत गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली. या सविस्तर चर्चेनंतर परिवहनमंत्र्यांनी तत्काळ साताऱ्यासाठी दहा मिनी ई-बसच्या निर्मितीचे आदेश पारीत केले.

​असा सुटला आर्थिक आणि तांत्रिक तिढा

वाढत्या खर्चामुळे एसटी महामंडळाला सिटी बससेवा चालवणे परवडत नसल्याने महामंडळाने राज्यातील सर्व शहरांमधील या सेवा बंद केल्या आहेत. दुसरीकडे, एका मिनी ई-बसची किंमत सुमारे एक ते सव्वा कोटींच्या घरात असल्याने या बसचा आर्थिक भार आणि देखभाल-दुरुस्तीचा खर्च उचलणे सातारा पालिकेलाही शक्य नव्हते. त्यामुळे शहर बससेवा सुरू करण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी परिवहनमंत्र्यांकडे दहा मिनी ई-बसची मागणी केल्याने शासनाकडून या बस उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

​असे असतील संभाव्य मार्ग

या नवीन मिनी ई-बस प्राप्त झाल्यानंतर सातारा शहरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. विशेष म्हणजे या बस सातारा एसटी महामंडळाकडूनच शहरात चालवल्या जातील. नागरिकांची सोय लक्षात घेऊन या बसचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने :
एसटी स्टॅण्ड ते बोगदा, ​एसटी स्टॅण्ड ते शाहूपुरी,
​एसटी स्टॅण्ड ते शाहूनगर, ​एसटी स्टॅण्ड ते राजवाडा, ​राजवाडा ते रेल्वे स्टेशन
​या प्रमुख मार्गांवर, तसेच शहरातील इतर आवश्यक भागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार आगामी काळात बसच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. आगामी काळात सातारा शहरात नागरिकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक आणि प्रदूषणमुक्त ई-बस सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला आहे. ‘सकाळ’च्या लढ्याला मिळालेल्या या यशामुळे सातारकरांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.
....
शिवेंद्रसिंहराजे - ४६३२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com