

सातारा जिल्ह्यातील प्रमुख
धरणांत ९४.८० टक्के पाणीसाठा
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांमध्ये मिळून ९४.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांची एकूण १४८.७४ टीएमसी पाणी साठवण क्षमता असून, सध्या या प्रकल्पांमध्ये १४१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी जिल्ह्यात ९४.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदाही जिल्ह्यातील पाणीस्थिती भक्कम झाली आहे.
जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात सध्या ९३.६७ टीएमसी म्हणजेच ९३.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. कोयना परिसरात १ जूनपासून आतापर्यंत ४,५६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ६,९४४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग शुक्रवारी (ता. २१) बंद करण्यात आला आहे. कोयना धरणाची पाणीपातळी ६५७.९१ मीटरवर पोहोचली असून, धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यातील इतर मध्यम व मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहता, धोम धरणात ११.४८ टीएमसी म्हणजेच ९८.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून आणि वीजगृहातून मिळून १,९२२ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. धोम-बलकवडी धरणात ३.७८ टीएमसी म्हणजेच ९५.४५ टक्के पाणीसाठा असून, तेथून ३३३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
कण्हेर धरणात ९.२ टीएमसी म्हणजेच ९५.९३ टक्के पाणीसाठा झाला असून, ६४० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. उरमोडी धरणात ९.३३ टीएमसी म्हणजेच ९६.६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, वीजगृहातून ४५० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तारळी धरणात ५.६६ टीएमसी म्हणजेच ९६.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, सांडवा आणि नदी विमोचकातून १,४७१ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व धरणांमधून मिळून एकूण ४,८१६ क्युसेक विसर्ग विविध नद्यांच्या पात्रात सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात धरणे भरणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे चित्र बदलले आहे. सर्वच धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.