सातारा जिल्हा बँक निवडणूक : शांततेत ९७ टक्के मतदान; आज मतमोजणी,

सातारा जिल्हा बँक निवडणूक : शांततेत ९७ टक्के मतदान; आज मतमोजणी,
Published on: 

सातारा जिल्हा बँकेसाठी
९७ टक्के मतदान

आज मतमोजणी, निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १) अत्यंत चोख बंदोबस्तात आणि शांततेत सुमारे ९७ टक्के मतदान पार पडले. जिल्ह्यातील कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन तालुक्यांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल १०० टक्के मतदानाचा टप्पा गाठला. दरम्यान, मतदानानंतर सर्व मतपेट्या कडेकोट सुरक्षेत रवाना करण्यात आल्या असून, आज (ता.३) मतमोजणी होणार असल्याने जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः थेट लक्ष ठेवले होते. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्यासह साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात व राहुल देशमुख यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. निवडणूक यंत्रणेचे सूक्ष्म नियोजन आणि जिल्हा पोलिस प्रशासनाचा कडक बंदोबस्त यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली असून कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व तालुक्यांतील मतपेट्या जरंडेश्वर नाक्यावरील हनुमान मंदिराजवळ असलेल्या सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहातील मतमोजणी केंद्रावर सुरक्षित आणण्यात आल्या. या मतपेट्या सीसीटीव्हीच्या निगराणीत आणि चोख पोलिस बंदोबस्तात स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या निवडणुकीची मतमोजणी आज (ता.३) सकाळी आठ वाजल्यापासून याच सभागृहात सुरू होत आहे. यासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहा टेबलांवर दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींसमोर मतपेट्या उघडून सुरुवातीला सर्व मतदारसंघांच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करून त्यांचे मतदारसंघनिहाय गठ्ठे तयार केले जातील. त्यानंतर प्रथम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघाची मतमोजणी होईल आणि त्यानंतर राखीव व औद्योगिक मजूर मतदारसंघांची मतमोजणी हाती घेतली जाईल.
मतमोजणी केंद्रावर केवळ निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिनिधी नियुक्तीसाठी विहित नमुन्यातील (८-अ) अर्ज मतमोजणीपूर्वी दाखल करणे आणि ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. निकाल प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.