

चारा जानेवारीपर्यंतच पुरणार
सातारा जिल्ह्यात दहा लाख ८४ हजार पशुधन; चारा उत्पादनाचे आव्हान
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दहा लाख ८४ हजार ९७६ पशुधनासाठी २८ लाख टन चारा उपलब्ध असला तरी हा साठा जानेवारी २०२७ अखेरपर्यंतच पुरण्याचा अंदाज आहे. दररोज १५ हजार टन चाऱ्याची गरज लक्षात घेता पुढील महिन्यांमध्ये टंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पुढील काळात दोन लाख ७५ हजार ६८३ टन अपेक्षित चारा उत्पादन घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
यंदा अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातही तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे कायम असल्याने पाण्यासह चारा टंचाईची चिंता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतानाच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध ठेवणे आवश्यक बनले आहे. विशेषतः दुष्काळी भागातील शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून चारा उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा बियाण्यांचे वाटप, हिरव्या चाऱ्याची लागवड यासारख्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांसाठी सुमारे ११ हजार ७१५ एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यातून अंदाजे दोन लाख ७५ हजार ६८३ टन चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांऐवजी शेतकऱ्यांच्या गावातच आणि थेट जनावरांच्या दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. वनक्षेत्रात चारा लागवड करण्यावरही भर देण्यात येणार आहे. मात्र वाढते तापमान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धतेमुळे नियोजित चारा उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आव्हान आहे.
आकडे बोलतात
- पशुधन : दहा लाख ८४ हजार ९८६
- उपलब्ध चारा : २८ लाख टन
- जनावरांसाठी दररोजची घट : १५ हजार टन
- चारा बियाणे (जानेवारी २०२७ अखेर) : १ लाख २८ हजार २६५ किलो
- प्रस्तावित पीक लागवड क्षेत्र : ११ हजार ७१५ एकर
- अपेक्षित चारा उत्पादन : दोन लाख ७५ हजार ६८३ टन
कोट ----
जिल्ह्यातील संभाव्य परिस्थिती पशुधनांसाठी प्रशासनाने चारा उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी धरणातील कमी झालेल्या पाणीसाठ्याच्या जमिनीवर बियाण्यांची लागवड केली जाणार आहे.
- डॉ. दिनकर बोर्डे,
उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.