

साताऱ्यात स्थायीच्या सभेत वादावादी
उदयनराजे समर्थकांच्या नगरसेवकांचा बहिष्कार; मनधरणीनंतर विषय मंजूर
सातारा, ता. १४ : पालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेदरम्यान बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांच्यात वाद झाला. या वादानंतर उपाध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांच्यासह उदयनराजे गटाच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. यानंतर केलेल्या मनधरणीनंतर नाराज गटाने सभेस उपस्थिती दर्शवत सभेपुढील विषयांना मंजुरी दिली.
पालिकेच्या स्थायी समितीची सभा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १२ वाजता कमिटी हॉलमध्ये आयोजिली होती. या सभेपुढे २०६ विषयांचा समावेश असणारी पत्रिका मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू करण्यात आले. एक -एक विषयाचे वाचन व त्यास मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच महापुरुषांच्या जयंती सोहळ्यासाठी झालेल्या खर्चाच्या मुद्द्यावर बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि नगरसेविका सुजाता राजेमहाडिक यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद नंतर वाढीस लागला. याचदरम्यान नियोजन सभापती अशोक शेडगे व बाळासाहेब खंदारे यांच्यातही वाद झाला. वाद वाढल्यानंतर ॲड. दत्ता बनकर यांच्यासह उदयनराजे यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाने सभेवर बहिष्कार टाकत सभास्थळ सोडले.
यामुळे सभेचे कामकाज रेंगाळले. यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटनेते अविनाश कदम यांनी नाराज झालेल्या ॲड. दत्ता बनकर व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर नगरसेवकांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा करत नाराज गटाची मनधरणी या वेळी करण्यात आली. यानंतर नाराज गट पुन्हा स्थायीच्या सभेसाठी उपस्थित राहिला. यानंतर काही मिनिटांतच पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यानंतर उदयनराजे यांचे नेतृत्व मानणाऱ्या नगरसेवकांनी गत सभेसह आत्ताच्या सभेत बाळासाहेब खंदारे यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत त्यांना तीन सभांना उपस्थित न राहण्यास मनाई करण्याची मागणी या वेळी केली. स्थायीच्या सभेत झालेल्या वादाचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता पालिका पदाधिकारी वर्तवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.