
सातारा: फलटण- लोणंद, पुणे रेल्वे गाड्या पुन्हा सुरू
फलटण शहर : कोरोनाच्या कालावधीत घटत्या प्रवासी संख्येअभावी थांबविलेली डेम्यू रेल्वे सेवा आजपासून पूर्ववतपणे सुरू करण्यात आली आहे. या लोहमार्गावरून आता फलटण- लोणंद व फलटण- पुणे या डेम्यू रेल्वे गाड्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा धावणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा: शिवाजी पार्कवर स्मारक नको, वाद थांबवा; मंगेशकर कुटुंबियांची मागणी
दहा कोच असलेल्या या गाड्या सोमवार ते शनिवार या दिवशी नियमितपणे धावणार आहेत. रेल्वे गाडी क्रमांक ०१५३५ ही पुणे येथून सकाळी ५.५० वाजता सुटेल व सकाळी ९.३५ वाजता फलटण येथे पोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१५३६ फलटण येथून सायंकाळी सहा वाजता सुटेल व पुणे येथे रात्री ९.३५ वाजता पोचेल. ही गाडी सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद व सुरवडी स्टेशनवर थांबेल. फलटण येथून नीरा ३०, जेजुरी ४०, सासवड ५५ व पुण्यासाठी ६० रुपये असा तिकीट दर असणार आहे.
हेही वाचा: चला, आंबोलीची करूया सफर!
गाडी क्रमांक ०१५३८ फलटण येथून सकाळी ११ वाजता सुटेल व १२.२० वाजता लोणंदला पोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१५३७ लोणंद येथून दुपारी तीन वाजता सुटेल व फलटण येथे ४.२० वाजता पोचेल. ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल. यासाठी फलटणहून सुरवडी व लोणंदसाठी ३० रुपये तिकीट दर असेल.
दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी प्रवास कालावधीमध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सुरक्षित शारीरिक अंतर राखण्यासह अन्य मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवाशांना दिलासा
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी बस बंद आहेत. खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर ही रेल्वेसेवा प्रवाशांना दिलासा देणारी ठरणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
Web Title: Satara Phaltan Lonand Pune Trains Resume
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..