ग्राहक पंचायतीचे निवेदन

ग्राहक पंचायतीचे निवेदन
Published on: 

‘स्वयंमूल्यनिर्धारण’ने कर आकारणी करा

सातारा पालिकेकडे मागणी; ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा, ता. १७ : सातारा पालिकेच्या आगामी चतुर्थ वार्षिक मिळकतकर पाहणीची प्रक्रिया नागरिकांच्या सहभागातून स्वयंमूल्यनिर्धारण पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडेही सादर करण्यात आला आहे.
सातारा नगरपालिका सध्या करपात्र मूल्यावर आधारित मिळकतकर आकारणी करते. आगामी चतुर्थ वार्षिक पाहणीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पारंपरिक पद्धतीने प्रत्येक मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी करण्याऐवजी नागरिकांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देऊन स्वतःच्या मिळकतीचे मोजमाप व आवश्यक माहिती सादर करण्याची संधी द्यावी, अशी भूमिका ग्राहक पंचायतीने मांडली आहे.
मिळकतकर आकारणीसाठी बांधकामाचा प्रकार, झोननिहाय दर, क्षेत्रफळ आणि कराचे निश्चित निकष आधीपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतः भरून दिलेल्या माहितीची नगरपरिषदेमार्फत यादृच्छिक (रँडम) पद्धतीने तपासणी केल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कमी खर्चात पूर्ण होऊ शकते, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
या पद्धतीमुळे चतुर्थ वार्षिक पाहणी निर्धारित वेळेत पूर्ण होईल, नगरपरिषद कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, पाहणीसाठी खासगी ठेकेदार नियुक्त करण्याची आवश्यकता राहणार नाही आणि नगरपरिषदेचे कोट्यवधी रुपयांचे संभाव्य खर्च वाचू शकतील, असेही ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले आहे.
याशिवाय मिळकतकर आकारणीसंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी व अपिलांचे प्रमाण कमी होईल, करप्रणालीत पारदर्शकता निर्माण होईल आणि नागरिक व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वाढेल. जाणूनबुजून चुकीची किंवा कमी माहिती देणाऱ्या मिळकतधारकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही ठेवता येईल, असे सुचविण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सदस्य जयदीप ठुसे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शहाणे, सातारा तालुकाध्यक्ष राहुल शिवनामे, उपाध्यक्ष संजय यादव आणि जिल्हा सदस्य विक्रांत भोसले उपस्थित होते.
.......................
66404
सातारा : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने नागेश पाटील यांना निवेदन देताना जयदीप ठुसे, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, संजय यादव, विक्रांत भोसले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.