शहराअंतर्गत प्रवासाचा खर्च जास्त

शहराअंतर्गत प्रवासाचा खर्च जास्त
Published on

लोगो : सिटी बस धावलीच पाहिजे (भाग दोन)
..............................................

शहरातील प्रवास पुणे- मुंबईपेक्षा महागडा

साताऱ्यात बस बंदचा परिणाम; १५ वर्षांत कोट्यवधींचा भुर्दंड, विद्यार्थ्यांचीही दररोज पायपीट

सातारा, ता. २० : शहरांतर्गत प्रवासासाठी सार्वजनिक बससेवेचा आधार मिळत नसल्याने सातारकरांना पुणे- मुंबईला जाणे स्‍वस्‍त; पण रोजच्‍या प्रवासासाठी साताऱ्यात प्रवास करणे महागडे अशी स्‍थिती प्रकर्षाने जाणवते. याचा सर्वात मोठा फटका गेल्या पंधरा वर्षांपासून विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. बससेवा उपलब्‍ध असती, तर ज्‍या प्रवासासाठी माफक भाडे मोजावे लागले असते; परंतु सध्‍या त्याच प्रवासासाठी आता रिक्षा किंवा खासगी वाहनासाठी दुप्‍पट, तिप्‍पटपेक्षा जादा पैसे मोजावे लागतात. त्यातून सातारकरांची सुटका होणे आवश्यक आहे.

नियोजनाच्या दूरदृष्टीचा अभाव
शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना विकासाचे व मूलभूत सुविधांच्या विकासाच्या ‘व्हिजन’चा अभाव साताऱ्याच्या जडणघडणीत मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्याचाच एक मुख्‍य भाग म्‍हणजे शहर बस वाहतूकच नसणे.
दोन रस्त्यांभोवती असलेल्या सातारा शहराचा गेल्या १५ वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शाहूनगर, शाहूपुरी, संगमनगर, तामजाईनगर असा चारही दिशेने साताऱ्याचा विस्तार झाला. हा विस्तार होताना नगर नियोजनाचा अभाव जाणवतोच, तसाच तो वाढत्या वस्तीच्या सार्वजनिक प्रवासाच्या सोयींचाही कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. सध्या साताऱ्यात एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अपवाद आहे तो परळी खोऱ्यातून येणाऱ्या महामंडळाच्या काही बसचा. त्यामुळे ‘सातारा शहर विकसित होत आहे’ या दाव्याच्या दुसऱ्या बाजूला ‘सातारकरांचा रोजचा प्रवास महाग होत आहे’ हे वास्तव गेल्या १५ वर्षांत निर्माण झाले आहे. शहराचा विस्तार झाला; मात्र नागरिकांना जोडणारी बससेवा वाढण्याचे सोडा ती सुरूही झाली नाही. परिणामी प्रवासाचा आर्थिक भुर्दंड सातारकरांनाच आपल्या खिशातून करावा लागत आहे.

...तर पासचा मिळाला असता आधार
बसबंदीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शहरातील विविध भागांतून शाळा, महाविद्यालये आणि क्लासेससाठी ये- जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक बससेवेअभावी बस पासच्या सवलतीचा लाभच घेता येत नाही. गेल्या काही वर्षांत वर्ये, म्हसवे, जैतापूर, औद्योगिक वसाहत या परिसरात महाविद्यालये उभी राहिली आहेत; परंतु या विद्यार्थ्यांना शहरातून महाविद्यालयापर्यंत जाण्यासाठी बसची सुविधा नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शहराऐवजी महाविद्यालयाजवळच रूम घ्यावी लागत आहे. काही क्लासेसही शहराबाहेर आहेत. त्यासाठीही जाताना विद्यार्थ्यांची परवड होते. शिक्षणाचा खर्च वाढत असतानाच प्रवासाचाही अतिरिक्त भारही सोसावा लागत आहे. एवढेच नव्‍हे पालकांच्‍या आर्थिक स्‍थितीचा विचार करून हे विद्यार्थी रोजची पायपीट सहन करत शिक्षणाची वाट धरत आहेत. ही बाब नक्‍कीच खेदाची आहे.

पालकांचीही रोज ‘शाळा’!
बससेवा नसल्याने अनेक पालकांना सकाळी मुलांना सोडण्यासाठी आणि दुपारी किंवा सायंकाळी आणण्यासाठी स्वतःचे वाहन बाहेर काढावे लागते. नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामे असतानाही, ती सोडून पालकांचा वेळ आणि इंधन यासाठी खर्च होतो. शहरात बससेवा असती तर पालकांना रोज दोन- दोन फेऱ्या मारण्याची गरज पडली नसती. विद्यार्थ्यांना सवलतीच्या बस पासवर स्वतंत्रपणे प्रवास करता आला असता. त्यामुळे एका कुटुंबावर दर महिन्याला होणारा अतिरिक्त आर्थिक भारही कमी झाला असता; परंतु त्‍याचे कोणालाच कसलेही सोयरसुतक नसल्‍याने, बिचारे पालकही तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करत विद्यार्थ्यांबरोबर दररोज शाळा करत आहेत.

नोकरदारांच्या पगारावरही ‘प्रवासाचा कर’
हा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाही. शहरातील विविध भागांतून कार्यालये, दुकाने, उद्योग, रुग्णालये आणि अन्य आस्थापनांमध्ये कामासाठी जाणाऱ्या नोकरदारांना, तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनाही रोज खासगी प्रवासाचा खर्च सोसावा लागत आहे. महिन्याचा पगार ठरलेला; घरखर्च ठरलेला; शिक्षण, घरभाडे, कर्जाचे हप्ते आणि इतर खर्च ठरलेले. त्यात सार्वजनिक बस नसल्याने दररोजच्या ये-जा खर्चाची भर पडत आहे. महिन्याच्या अखेरीस ही छोटी वाटणारी रक्कम मोठ्या खर्चात रूपांतरित होते. पंधरा वर्षांपासून बससेवा बंद असल्याने सातारकरांना आपल्या उत्पन्नातील एक हिस्सा केवळ शहरात फिरण्यासाठी प्रवास कर म्हणून खर्च करावा लागत आहे.

पुण्यापेक्षा द्यावे लागतात जास्त पैसे
मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांना जाण्यासाठी प्रवासाचे अंतर मोठे आहे; परंतु नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. बस, रेल्वे व्यवस्थेमुळे नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार तुलनेने किफायतशीर पर्याय निवडता येतो; परंतु पुण्या- मुंबईहून साताऱ्याला आलेल्या नागरिकांना शाहूपुरी, शाहूनगरमध्ये लांबच्या अंतरावर किंवा रेल्वेने आलेल्यांना शहरात येण्यासाठी मूळ प्रवासापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. रिक्षाशिवाय नागरिकांना पर्याय नाही. रिक्षा टेरिफच्या योग्य आकारणीकडे कोणत्याच यंत्रणेचे लक्ष नाही. त्यातच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्यामुळेचा हा प्रवासाचा जादा खर्च निमूटपणे सहन करावा लागत आहे.

लाडक्या बहिणी, ज्येष्ठांना जास्त फटका
निवडणुकांच्या तोंडावर शासनाने ६५ वर्षांवरील नागरिकांना, तसेच लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. त्याचबरोबर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाची सवलत दिली आहे. त्यामुळे सवलतीस पात्र असलेल्यांना जिल्ह्यातील अन्य ठिकाणावरून किंवा परजिल्ह्यातून साताऱ्यात येण्यासाठी कमी पैसे लागतात; परंतु त्यांना साताऱ्यात आल्यावर मूळ प्रवासापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. साताऱ्यातील प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सवलतधारकांना तोटा होत आहे.
........................

पाठवा प्रतिक्रिया
सातारा शहरासह नजीकच्या परिसरात बससेवा सुरू होण्‍याची नितांत गरज सातारकरांच्‍या विविध स्‍तरांतून व्‍यक्‍त होत आहे; पण याबाबत आपल्‍याला काय वाटते, हेही महत्त्‍वाचे. त्‍यासाठी आपणही आपल्‍या प्रतिक्रिया sakal_satara@esakal.com या इमेलसह ९४२३० ०००६६ अथवा ९७६७० ४११२५ या व्‍हॉट्‌सॲप क्रमांकांवर पाठवाव्‍यात. ‘सकाळ’ तुमच्‍या प्रतिक्रियांतून शहर बससेवेची सोय होण्‍यासाठी त्‍यास प्रसिद्धी देईल.
....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com