

पिंपळवंडी, ता. २४ : जुन्नर शहराच्या पूर्वेकडील सुसरबाग परिसरात शेतीच्या मशागतीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांना सुमारे २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. यामध्ये भाजलेल्या मातीचे विविधरंगी मणी, घराची कौले आणि समुद्र शंखाच्या बांगड्यांचे तुकडे सापडले असल्याची माहिती जुन्नरच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी दिली.
बापूजी ताम्हाणे हे गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर परिसरातील प्राचीन पाऊलखुणांचा अभ्यास करत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना सुसरबाग येथे हे अवशेष आढळले. सखोल अभ्यासानंतर त्यांनी हे अवशेष सातवाहन काळातील असल्याची खात्री केली. ताम्हाणे यांच्या मते, सातवाहन काळात कुकडी नदीच्या काठावर असलेल्या या पांढऱ्या मातीच्या टेकडीवर एक मोठी मानवी वस्ती होती.
या शोधांमुळे सातवाहन काळातील कला, संस्कृती आणि लोकांच्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पडणार आहे. सापडलेल्या अवशेषांवरून असे दिसून येते की, येथील लोकांना मणी आणि दागिने बनवण्याचे प्रगत तंत्रज्ञान अवगत होते. येथे तयार होणारा माल जुन्नरच्या बाजारपेठेतून प्रतवारी होऊन कल्याण व भडोच बंदरांमार्फत पाश्चिमात्य देशांत निर्यातीसाठी पाठवला जात असे. मण्यांव्यतिरिक्त या ठिकाणी फुटलेली भांडी, विटा, धान्य दळण्याचे जाते आणि पाटे-वरवंटे देखील सापडले आहेत.
सुपारीच्या आकाराचे आकर्षक मणी
सुसरबागमध्ये सापडलेले भाजलेल्या मातीचे मणी लाल, काळे, पिवळे आणि विटकरी रंगाचे आहेत. यातील काही मणी सुपारीच्या आकाराचे असून ते साच्याशिवाय, हाताने चाकावर घडवलेले असावेत. काही मण्यांवरील गोलाकार भागावर पांढऱ्या रंगाच्या रेषांची ठळक पट्टी दिसून येते. माळेत व्यवस्थित ओवता यावे, यासाठी मण्यांना आरपार छिद्रे पाडलेली आहेत, जे तत्कालीन कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे. सातवाहन काळात स्त्री आणि पुरुष दोघेही अलंकार म्हणून अशा मण्यांच्या माळा वापरत असत.
मानमोडी लेणीसमूहात कोरलेल्या लेण्यांत बौद्ध भिक्खू संघ राहत असे. सातवाहन काळातील लोकवस्ती जुन्नरजवळील सुसरबाग, आगरगाव, दिल्ली पेठ येथील कुकडी नदीच्या काठावरील पांढऱ्या मातीच्या टेकडीच्या ठिकाणी होती. त्यांचे पुरावे देखील अभ्यासकांना मिळालेले आहेत. हे मणी सातवाहन काळातील असून पुरातत्त्व विभागाने पुन्हा एकदा जुन्नरमध्ये उत्खनन करणे गरजेचे आहे.
- अरुणा वाघोले,
इतिहास विभाग प्रमुख, आळे महाविद्यालय, जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.