

सातगाव पठार, ता. १८ : लांबलेला पाऊस आणि वाढलेल्या उन्हामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु महावितरणकडून विजेच्या कमी दाबामुळे आणि अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. विजेच्या लपंडावामुळे पेठ, पारगाव परिसरातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.
आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामात पेठ, पारगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव आदी गावांत शेतकऱ्यांनी १५३३, एफसी ११, एफसी ५ व ज्योती आदी जातींचे बटाटा पीक घेतले आहे. लागवडीनंतर वेळेवर पाऊस झाल्याने बटाटा पीक जोमदार होते. फुलोराही चांगला आला होता. परंतु ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भागात कडक ऊन पडत आहे. त्यामुळे बटाटा पिकांनी माना टाकल्या आहेत. सध्या दोन ते सव्वादोन महिन्यांचे पीक झाले आहे. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. परंतु कमी दाबाच्या विजेमुळे विद्युत मोटारी पूर्ण क्षमतेने सुरू होत नाहीत किंवा सुरूच होत नाहीत. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येत नाही. पिकांना पाण्याची गरज असताना विजेचा लपंडाव सुरू असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णता वाढली आहे. परिणामी बटाटा, सोयाबीन व अन्य पिके सुकू लागली आहेत. विजेअभावी पाणी उपलब्ध असूनही देता येत नाही. त्यामुळे अडचण झाली आहे. महावितरण कंपनीने पूर्ण दाबाने अखंडित व सुरळीत वीजपुरवठा द्यावा.
- सुनील तोत्रे, माजी अध्यक्ष, कुरवंडी कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी
विद्युत रोहित्रापासून लांब असलेल्या मोटारींना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. महावितरणमार्फतही कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनीही कॅपेसिटर बसविल्यास समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल.
- आशुतोष शेवाळे, शाखा अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.