सातपुड्यातील प्रकल्पांत पाणी आवक घटली

सातपुड्यातील प्रकल्पांत पाणी आवक घटली
Published on

सातपुड्यातील प्रकल्पांत पाणी आवकेत घट

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात सातपुडा पर्वतातील काही लघू व मध्यम प्रकल्प भरले आहेत. त्यात अनेक प्रकल्पांतील पाणी आवक पावसाने ओढ दिल्याने थांबली आहे. यावल तालुक्यातील हरिपुरा, निंबादेवी प्रकल्पातील पाणी आवक बंद अवस्थेत आहे.
नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगरलगत सातपुडा पर्वतरांगा आहेत. या भागात अनेक लहान-मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात नंदुरबारातील सुसरी प्रकल्पाचे लाभक्षेत्र सातपुडा भागात आहे. हा लघू प्रकल्पदेखील भरलेला नाही. कारण नंदुरबारात पाऊसमान यंदा कमी आहे. शिरपुरातील अनेर प्रकल्पदेखील रिकामा आहे. चोपड्यातील गूळ प्रकल्पातही जलसाठा ४५ टक्क्यांवर आहे. यावलमधील मोर मध्यम प्रकल्पदेखील भरण्याच्या स्थितीत नाही. यात रावेरातील मंगरूळ प्रकल्पातील जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत आहे. तसेच अभोडा, सुकी प्रकल्पदेखील ७० टक्क्यांवर भरले आहेत.
यावलमधील मोर, रावेरातील अभोडा व सुकी हे प्रकल्प मागील वर्षी जुलैमध्येच भरले होते. परंतु यंदा या प्रकल्पांच्या क्षेत्रात पाऊसमान कमी आहे. सध्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस नसल्याने प्रकल्प पूर्ण भरलेले नसल्याची स्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यात भुसावळ नजीकच्या तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातही आवक सुरू आहे. तापी नदीच्या उगमक्षेत्रात व पूर्णा नदीच्या क्षेत्रातही चांगला पाऊस मागील पंधरवड्याच्या सुरुवातीला झाला होता. तापी नदीचे उगमक्षेत्र सातपुडा पर्वतात बैतुल भागात आहे. सातपुड्यातून ही नदी खानदेशात येते. खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांतून नदीचा मोठा प्रवाह जातो. पुढे गुजरातेत ही नदी जाते. हतनूर धरणात पाण्याची आवक मात्र सध्या कमी आहे. जलसाठा नियंत्रणासाठी हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीला प्रवाही पाणी आहे. मागील १५ दिवसांपासून तापी नदीत जलप्रवाह आहे. मध्यंतरी तापीत प्रवाह वाढला होता. कारण हतनूरचे चार दरवाजे उघडले होते. तापी नदीकाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.

पश्चिम भागात प्रकल्पांत कमी जलसाठा
जळगावच्या पश्चिम भागातील मन्याड, बोरी, भोकरबारी या प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे. गिरणा नदीवरील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातही जलसाठा सुमारे ३८ टक्के आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. पण त्याचा उपयोग जळगाव जिल्ह्यात अधिक आहे. १८ टीएमसी एवढी त्याची साठवण क्षमता आहे. तसेच तोंडापूर, अंजनी, अग्नावती, बहुळा, धुळ्यातील पांझरा, मालनगाव, बुराई, सोनवद या प्रकल्पांतील पाणी आवकही थांबल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com