मृत रुग्णांच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती

दिलीप कुर्हाडे
सोमवार, 14 मे 2018

मनोरुग्णालयातील मृत रुग्णांच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात येणार आहे. रुग्णांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणार असून भविष्यात रुग्ण मृत्यूमुखी पडणार नाही याची उपाययोजना करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रभारी उपसंचालक डॉ. संजय देशपांडे यांनी दिली.
 

येरवडा (पुणे) - मनोरुग्णालयातील मृत रुग्णांच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती स्थापन करण्यात येणार आहे. रुग्णांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणार असून भविष्यात रुग्ण मृत्यूमुखी पडणार नाही याची उपाययोजना करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रभारी उपसंचालक डॉ. संजय देशपांडे यांनी दिली.

मनोरूग्णालयातील तीस रुग्णांचा मृत्यू या 'सकाळ' मधील बातमीची दखल घेऊन डॉ. देशपांडे व सहायक संचालक डॉ. पी.जी.दर्शने यांनी सोमवारी रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयाच्या प्रभारी अधिक्षिका डॉ. मधुमिता बहाले, उपअधिक्षक एस. वडार उपस्थित होते. डॉ. देशपांडे म्हणाले, ''सत्यशोधन समितीमध्ये रुग्णालयाचे अधिक्षक, उपअधिक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अधिसेविका, आहारतज्ज्ञ आणि चर्तुथ श्रेणीतील एक कर्मचारी असणार आहेत. ही समिती रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृत्यूची कारणे शोधणार आहे. तसेच ज्या कारणासाठी मृत्यू झाला त्यावर तत्काळ उपायोजना करून इतर रुग्णांचा त्याच कारणासाठी मृत्यू होणार नाही याची काळजी घेणार आहे''. 

सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत बत्ते, महिला आघाडीच्या अध्यक्षा विशाखा गायकवाड यांनी डॉ. बहाले यांना यासंदर्भात निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी रुग्णांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. रुग्णांना कोणत्या सोई-सुविधा देण्यात येतात, रुग्णांची नियमित आरोग्य तपासणी होते का, रुग्णालयातील सफाई नियमित केली जाते का आदींची माहिती दहा दिवसात देण्याची त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे मागितली. आज दुपारी डॉ. दर्शने यांनी फिट वॉर्ड, गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात अशा कक्षाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. वॉर्डातील सांडपाणी वाहिन्या तुंबलेल्या असून नियमित सफाई होत नाही, रविवारी सफाई कामगार कोणीच नसतात, सफाईसाठी निकृष्ट दर्जाचे दोन मग फिनेल दिले जाते, रात्रपाळीच्या वेळी सफाई कामगार नसल्याच्या तक्रारी परिचारिकांनी केल्या. अतिगंभीर नऊ रुग्णांची चौकशी व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती दर्शने यांनी घेतली. 

तीन कोटी रूपये खर्च करून रुग्णालयातील सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उत्तम पुरी यांनी दिली. मात्र सांडपाणी वाहिन्या रस्त्याच्या मधोमध टाकल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
 

Web Title: Satyashodhan committee for inquiry of dead patients