

सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा कायापालट;
८९ कोटी खर्चास प्रशासकीय मंजुरी, जमीन खरेदीसाठी १० कोटी
१५० कोटींतून मंदिर, संतसृष्टी, भक्तनिवास,
स्कायवॉक, वाहनतळासह भाविकांसाठी सुविधा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ०२ :
संत शिरोमणी सावता महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या अरण (ता. माढा) येथील संजीवन समाधी मंदिर तीर्थक्षेत्राचा तब्बल १५० कोटी २३ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर या आराखड्याला आता प्रत्यक्ष कामांची जोड मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ८९.०८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मार्च २०२६ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ८९ कोटींच्या कामांसाठी सोलापूर जिल्हा परिषद ही अंमलबजावणी यंत्रणा म्हणून जबाबदारी दिली आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहेत, पण त्यास मुहूर्त मिळाला नाही.
या विकास आराखड्यात मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभीकरण, संतसृष्टी संग्रहालय, संत शिरोमणी सावता महाराज व श्री विठ्ठल यांचे ब्राँझ पुतळे, भक्तनिवास, अन्नछत्र, दर्शन मंडप, सभा मंडप, स्कायवॉक, वाहनतळ, पालखीतळ, बसथांबा, पाणीपुरवठा, ड्रेनेज, जलपुनर्भरण, स्वच्छतागृहे आणि परिसराचे सुशोभीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. या आराखड्यात मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण हे प्रमुख काम आहे. मंदिरासाठी जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मंदिराचे डिझाइन आकर्षक आणि मोठ्या जागेत असावे, अशा सूचना दिल्या आहेत.
संतसृष्टी संग्रहालयातून संतविचारांचा जागर
अरणमध्ये प्रस्तावित ‘संतसृष्टी म्युझियम’ हा आराखड्याचा विशेष आकर्षणाचा भाग आहे. संत सावता महाराजांचे जीवन, कार्य, संतपरंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा यांचे दर्शन या संग्रहालयातून घडविण्याचा उद्देश आहे. यासोबतच म्युझियम परिसरातील मीडिया, रंगकाम आणि भिंतीवरील चित्रांचाही विकास आराखड्यात समावेश आहे. भक्तनिवास, अन्नछत्र, दर्शन मंडप, छत असलेली मार्गिका, स्वच्छतागृहे आणि देवस्थान प्रशासकीय कार्यालय उभारण्याचे नियोजन आहे. तीर्थक्षेत्र परिसरातील वाहतूक आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्कायवॉक, कमान, वाहनतळ आणि पालखीतळ सुधारणा केली जाणार आहे. याशिवाय पोहोच मार्ग सुधारणे, हार्डस्केप व परिसराचे सौंदर्यीकरण अशी कामेही आराखड्यात आहेत.
निधीचे चित्र काय..
बाब - निधी
भूसंपादनासह एकूण आराखडा - १५०.२३ कोटी
पहिला टप्पा - प्रशासकीय मान्यता - ८९.०८ कोटी
मंदिरासाठी जागा खरेदी - १० कोटी निधी उपलब्ध
उर्वरित आराखडा - ६१.१५ कोटी
---------पूर्ण----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.