‘सावित्री जत्रेत’ ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ

‘सावित्री जत्रेत’ ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ

Published on

वडगाव मावळ, ता. ६ : उमेद अभियानांतर्गत पुण्यातील शेतकी कॉलेज मैदानावर ७ ते ११ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सावित्री जत्रेमध्ये मावळ तालुक्यातील १५ बचत गट सहभागी होणार आहेत.
ग्रामीण महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ‘सावित्री जत्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सावित्री जत्रा’ हे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. जत्रेमध्ये मसाले, पापड, लोणचे, सेंद्रिय शेती उत्पादने, हातमाग व हस्तकला वस्तू, साड्या, ड्रेस मटेरिअल तसेच घरगुती खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अस्सल चव, हाताची कला आणि पारंपरिक थाट अनुभवण्याची संधी पुणेकरांना या निमित्ताने मिळणार आहे.

मावळातील १५ बचत गटांचा सहभाग
या जत्रेसाठी मावळ तालुक्यातून १५ बचत गटांची निवड करण्यात आली आहे. संबंधित गटांचे पॅकिंग व ब्रँडिंग उत्कृष्ट असून जत्रेसाठी जनरल, व्हेज आणि नॉन-व्हेज अशा तीन प्रकारातील स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. मावळातील हिरकणी, अष्टविनायक, राधा, सीमांतनी, शिवकन्या, सिंधुताई, तासुबाई, कृषी वेध, रागिणी, प्रतिभा, रणरागिनी, श्री स्वामी समर्थ, श्री गुरू, जीवनज्योती, झेप, क्रांती हे बचत गट सहभागी होऊन सर्व प्रकारचे मसाले, लाकडी घाण्याचे सर्व प्रकारचे तेल, हुरड्याचे थालीपीठ, अगरबत्ती, धूप, बिस्कीट एनर्जी बार, इंद्रायणी तांदूळ, गहू कुरडया, तांदळाचे खिंचे, नाचणी पापड, सर्व प्रकारचे सेंद्रिय कडधान्ये आदींची विक्री करणार आहेत. दोन अस्सल मावळी खाद्य पदार्थांचेही स्टॉल असणार आहेत.

‘‘जिल्हा परिषद, पुणे व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित होणारी ही जत्रा महिला उद्योजिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. ग्रामीण महिला उद्योजकतेला चालना देणारा आणि स्थानिक उत्पादनांना शहरात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे. या जत्रेसाठी मावळ तालुक्यातून १५ बचत गटांची निवड करण्यात आली आहे. या गटांचे पॅकिंग व ब्रँडिंग उत्कृष्ट आहे. महिलांनी मोठ्या संख्येने जत्रेला भेट द्यावी.
- कुलदीप प्रधान, गटविकास अधिकारी, मावळ पंचायत समिती
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com