महिला सक्षमीकरणासाठी ‘सावित्री हाट’

महिला सक्षमीकरणासाठी ‘सावित्री हाट’
Published on: 

पुणे, ता. ५ : महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत ‘सावित्री हाट’ सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांची थेट विक्री करता येणार असून, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.
महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांतील महिलांकडे खाद्यपदार्थ, हस्तकला, प्रक्रिया केलेली उत्पादने तसेच विविध गृहउपयोगी वस्तूंची निर्मिती करण्याचे कौशल्य आहे. मात्र, या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन जुन्या जिल्हा परिषद इमारतीत ‘सावित्री हाट’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी ६२ लाख १२ हजार ६७९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला सबलीकरण व बालकांचा विकास या लेखाशीर्षाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

‘उमेद मॉल’नंतर आता ‘सावित्री हाट’
महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उभारण्यात येणाऱ्या ‘उमेद मॉल’साठी नुकताच शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यापाठोपाठ आता ‘सावित्री हाट’च्या माध्यमातून आणखी एक विक्री केंद्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी दोन स्वतंत्र व्यासपीठे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पावले पडली आहेत. बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासह महिलांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी या केंद्रांचा उपयोग होईल, असेही जगदाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.