
देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सर्वाधिक गुण असलेल्या विषयातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नापास झाले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तज्ज्ञांच्या पर्सेप्शनमध्ये नापास; रॅंकींगमध्ये बसला फटका
पुणे - देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत सर्वाधिक गुण असलेल्या विषयातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नापास झाले आहे. नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) तज्ज्ञांचे पर्सेप्शन (पीअर पर्सेप्शन) या विषयात विद्यापीठाला १०० पैकी फक्त १६.९७ गुण प्राप्त झाले आहे. तर विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विज्ञान संस्थेला (आयआयएससी) याच विषयात १०० गुण आणि दुसऱ्या क्रमांकावरच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला ५९.१९ गुण मिळाले आहे.
मागील तीन वर्षांपासून विद्यापीठाची क्रमवारी दरवर्षी घसरत चालली आहे. २०२० मध्ये नऊ क्रमांकावर असलेले विद्यापीठ आता १२ व्या क्रमांकावर आले आहे. नव्या दमाची खासगी विद्यापीठे आता शर्यतीत आली असून, इथून पुढच्या काळात विद्यापीठाला क्रमवारी टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले,‘‘पीअर पर्सेप्शन निश्चित करण्यासाठी थेट विद्यापीठाचा संबंध नाही. लोकांमध्ये पर्सेप्शन निश्चित करण्यासाठी विद्यापीठाला प्रसिद्धीसाठी प्रयत्न करावे लागते. राज्य विद्यापीठामध्ये याची सोय असतेच असे नाही. मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती थांबलेली असून, त्यामुळेच विद्यार्थी- शिक्षक गुणोत्तर निश्चितच कमी झाले आहे.’’ प्राध्यापक भरतीबरोबरच संशोधन आणि पेटंटमध्ये झालेली वाढ विद्यापीठाला येत्या काळात क्रमवारीत पुढे नेईल.
विद्यापीठाचे गुणपत्रक -
विषय - मिळालेले गुण - एकूण गुण
- तज्ज्ञांचे पर्सेप्शन - १६.९७ - १००
- विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर - १८.५४ - २५
- पेटंट आणि शोधनिबंध (आयपीआर) - ०.५० - १५
- परराज्यातील आणि परदेशातील विद्यापीठांचे विद्यार्थी - ३.५५ - ३०
- परीक्षांचे वैविध्य - ६० - ६०
या विषयांमुळे क्रमवारी घसरली (जेएनयुशी तुलना) -
विषय - पुणे विद्यापीठ - जेएनयु
- तज्ज्ञांचे पर्सेप्शन - १६.९७ - ५९.१९
- विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर - १८.५४ - २४.२७
- पेटंट आणि शोधनिबंध - ०.२० - २
राज्य विद्यापीठ म्हणून आपल्या काही मर्यादा असल्याने परदेशी आणि परराज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कलकत्त्याचे जाधवपुर विद्यापीठ हे सार्वजनिक विद्यापीठात देशात प्रथम आहे. मात्र तेथे केवळ शिक्षकांची संख्या १२०० आहे तर आपल्याकडे मंजूर शिक्षक ३६८ असून त्यातील ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे भविष्यात आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर राज्य सरकारचे सहकार्य गरजेचे आहे.
- डॉ.संजीव सोनवणे, प्र - कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Web Title: Savitribai Phule Pune University Failure In Perception Of Experts Hit In The Ranking
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..