विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे विद्यापीठ 'अशी' घेणार तोंडी परीक्षा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

मार्च महिन्यात घोषित केलेल्या लॉकडाऊनपूर्वी विद्यापीठ व संशोधन केंद्र येथे पीएचडी आणि एमफिल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम पूर्ण झाले होते.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभाग आणि मान्यताप्राप्त संशोधन केंद्रातर्फे संशोधन करणाऱ्या एमफिल आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. त्याबाबत परीपत्रक काढण्यात आले आहे.  

विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्र १ ते ३० जून या कालावधीत शैक्षणिक कामकाजासाठी बंद राहतील. परंतु या कालावधीत आवश्‍यकतेनुसार ऑनलाईन अथवा दूरस्थ माध्यमातून शैक्षणिक कामकाज करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनने दिल्या आहेत.

अमोल कोल्हे म्हणतात, कोरोनाबरोबर राहण्याची तयारी ठेवली पाहिजे

मार्च महिन्यात घोषित केलेल्या लॉकडाऊनपूर्वी विद्यापीठ व संशोधन केंद्र येथे पीएचडी आणि एमफिल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम पूर्ण झाले होते. त्यांना मौखिक परीक्षांच्या तारखा निश्‍चित करण्यात आल्या होत्या. पण त्या नंतर रद्द करण्यात आल्या होत्या.

विद्यापीठ परीक्षांबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शकतत्वांमध्ये संशोधक विद्यार्थ्यांचे मौखिक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी अशी सूचना केली होती. त्यानुसार विद्यापीठाने सर्व संशोधन केंद्राना यंत्रणा उभारणीच्या सुचना केल्या आहेत. तसेच मार्गदर्शकांनी संशोधक विद्यार्थ्यांची 'पीएचडी ट्रेकिंग सिस्टिम' यावर अद्ययावत करणे आवश्‍यक आहे, असे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने स्पष्ट केले आहे.

- राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आमदारांनी काय सल्ला दिला? वाचा सविस्तर!

पुणे विद्यापीठ परीक्षेची तयारी सुरूच ठेवणार

अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा लेखी आदेश अद्याप आलेला नाही, त्यामुळे या परीक्षेची तयारी सुरूच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

कोरोना मुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होईल, त्यामुळे अंतीम वर्षांची परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थी करत होते, राज्य सरकारनेही यानुसार निर्णय घेऊन परीक्षा रद्द केली. पण राज्यपालांनी केलेल्या विरोधामुळे सरकारने अद्याप लेखी आदेश काढलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होणार की नाही यावरून संभ्रम आहे.

- वीजबिल भरणा केंद्रे झाली सुरू; महावितरणने ग्राहकांना केलंय 'हे' आवाहन!

दरम्यान, पुणे विद्यापीठाने पूर्वीच्या आदेशानुसार विद्या परिषदेत परीक्षा पद्धतीवर निर्णय घेतला आहे, त्यावर आज व्यवस्थापन परिषदेत चर्चा करण्यात आली, अनेक सदस्यांनी परीक्षा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यानुसार पुढील आदेश येई पर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरूच ठेवावी असा निर्णय घेतला आहे. तसेच याचे अधिकार कुलगुरूंकडे देण्यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Pune University will conduct oral examination of MPhil and PhD students through video conferencing