पुणे : दुपारी एकचा पेपर, पावणे सातला सुरू झाला; विद्यापीठ परीक्षेत 'महागोंधळ'

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 13 October 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा सुरळीत सुरू झाली. पण, ऑनलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे 'महागोंधळ'चा सामना करावा लागला.

पुणे : माझ्या मुलाचा एमबीए तिसऱ्या सत्राचा बॅकलॉगचा 'इंटरप्रायजेस परफॉर्मन्स मॅनेजमेंट'चा विषयाची परीक्षा 1 वाजता सुरू होणार होती. पण, स्क्रीनवर 'नो टेस्ट ऍक्टि्व्ह, प्लीज कॉन्टॅक्टा युवर ऍडमिनीस्ट्रेटर' असा मेसेज दिसत होता. म्हणून हेल्पसेंटरला फोन केला असता हा प्रॉब्लेम सर्वांनाच आहे, थोड्यावेळ थांबा असे सांगण्यात आले. खूप खटाटोप केल्यानंतर अखेर त्याचा पेपर पावणे सात वाजता सुरू झाला, मुलाने आता उद्याच्या अभ्यासाची तयारी कधी करावी,'' असे एक पालक संतापाने "सकाळ'शी बोलत होते. तर छाया भडके यांच्या मुलीचा बीसीएसचा दुपारी चार वाजता पेपर होता, तो संध्याकाळी सात वाजून गेले तरी झाला नाही, त्यांनी तिच्या महाविद्यालयाकडे चौकशी केली असता आमचा काही संबंध नाही असे सांगून टाकले. विद्यापीठाशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे चिंताग्रस्त झालेले कुटुंब "सकाळ'मध्ये येऊन त्यांची कैफियत मांडत होते. अशा प्रकारे कधी अधिक प्रमाणात मंगळवारी (ता.13) हीच अवस्था अनेक विद्यार्थी, पालकांची होती. 

आणखी वाचा - डीएसके प्रकरणात न्यायलयाचे नवे आदेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा सुरळीत सुरू झाली. पण, ऑनलाइन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे 'महागोंधळ'चा सामना करावा लागला. यामध्ये एमबीए, विधी, एमएससी, बीएस्सी, एमए, बीसीए यासह इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी ना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मंगळवारी दिवसभरात 138 विषयांच्या परीक्षांचे नियोजन होते. त्यासाठी सुमारे 1 लाख विद्यार्थी ऑनलाइन तर, सुमारे 7 हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार होते. सकाळच्या सत्रात शुभम राठोड या विद्यार्थ्याचा एमएससी इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर होता, तर पण त्याला गणिताचा पेपर आला. यासाठी त्याने कॉलसेंटरला फोन केला पण त्याचा संपर्क होऊच शकला नाही. तर दुपारच्या सत्रात 1 ते 2 या वेळेत "फिजिक्सन ऑफ सेमिकंडक्टणर डिव्हाईस' हा पेपर होता, पण तो बराच वेळ सुरू झाला नाही.
नीलेश महिंद्रकर म्हणाला, माझा अर्थशास्त्राचा पेपर इंग्रजी मधून येणे अपेक्षित होते, पण तो मराठीतून प्रश्न आल्याने मला उत्तरे सोडवता आली नाहीत. इंग्रजीतून प्रश्नपत्रिका मिळावी म्हणून हेल्पलाइनला फोन केला, पण संपर्क झाला नाही, अनेक प्रश्न मी सोडवू शकलो नाही. हे नुकसान कसे भरून काढणार?

आणखी वाचा - एमपीएससी परीक्षेबाबत, मोठा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासा

शुभम राठोड म्हणाला, माझा एमएससी इलेक्ट्रॉ निक बॅकलॉगचा पेपर होता पण लॉगिन केलं तर तर गणिताचाच पेपर आला. विद्यापीठाच्या हेल्पलाइनची वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. ठरलेल्या वेळापत्रक शिवाय दुसरा पेपर आल्याने गोंधळ झाला आहे. आम्हाला यातून दिलासा दिला पाहिजे. सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षेच्या तक्रारींचा पाऊस पाडला. विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क होत नसल्याने विद्यार्थ्यांनी ट्‌विटरवर त्यांच्या अडचणी मांडल्या. अनेकांनी ऑनलाइन परीक्षा देताना स्क्रीनशॉट व फोटो काढून पुराव्यासह तक्रारी केल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेळेत सुरू झाली परीक्षा
सोमवारी विद्यापीठाची परीक्षा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन परीक्षेचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. नियोजित वेळापत्रकापेक्षा अडीच ते तीन तास उशिरा पेपर सुरू झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आज दुसऱ्या दिवशी ऑफलाइन परीक्षा वेळेत सुरू झाली. विद्यापीठाकडून सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रश्नपत्रिका व ओटीपी पाठवण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. आज कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही असे काही परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले.

काही तांत्रिक अडचणी वगळता ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास त्यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

"सकाळ'कडे मागितली मदत
ऑनलाइन परीक्षेत येणाऱ्या अडचणींमुळे विद्यापीठाने दिलेल्या 9717796797 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा फोन केला, पण तेथे प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक पालक, विद्यार्थ्यांनी "सकाळ' कार्यालयात संपर्क साधून त्यांच्या अडचणी सांगून मदत मागितली.

काय घडले? 

  • बीसीएसचा थॅरॉटिकल कॉम्प्युटर सायन्सचा चार वाजताचा पेपर सात वाजून गेले तरी झालाच नाही
  • अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता पेपर झाल्याचे सांगितले.
  • इंजिनिअरिंगच्या "एचवायपी' विषयाच्या पेपरला सुमारे 20 प्रश्नां ना आकृती न येत केवळ पर्याय आले
  • विधीचा एक वाजता ज्युरीसुप्रीडन्सचा पेपर होता, पण पेपर साडे तीनला सुरू झाला. त्याआधी लॅड लॉचा पेपर दिला
  • फिजिक्सएचा सेमिकंडक्टपर हा एक वाजताचा पेपर तीन वाजता काही विद्यार्थ्यांनी सोडविला
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: savitribai phule university online exam mess