Video : वीणेचा झंकार अन्‌ वेणुनादात श्रोते दंग

Girish-and-Archana
Girish-and-Archana

पुणे - सरस्वती वीणेच्या झंकारात रमलेला मधुर नटकुरंजी... सायंकाळच्या कुशीत उमललेला मुलतानी, जोगकंस अन्‌ वेणुनादातून उमटलेल्या ‘हेमवती’ने रसिकांच्या कानी रुंजी घालत नादब्रह्माचा विलक्षण आनंद आज दिला.

आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दिमाखदार सुरुवात झाली. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी पहिल्या सत्राची सुरुवात मुलतानी रागाने केली. एकतालातील ‘गोकुल गाँव’, त्रितालातील ‘सखी येरी आली रे’ या बंदिशींना आळवीत एका ठुमरीचा गोडवा ऐकवला. गायनाचा समारोप त्यांनी ‘जन विजन झाले आम्हा’ या संतवाणीने केला. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव आणि संवादिनीवर प्रभाकर पांडव यांनी साथसंगत केली.

जयंती कुमरेश यांच्या वीणावादनाने सवाईच्या स्वरांगणात चैतन्य आणले. सुरुवातीला बागेश्रीसारखा मंजुळ भासणारा नटकुरंजी पेश केला. घटम आणि मृदंगाच्या ताल-बोलांशी खेळत त्यांनी स्वरांवर केलेले न्यास-विन्यास, मिंडकाम याला रसिकांनी टाळ्यांचा गजर करून मनसोक्त दाद दिली. नंतर किरवाणीचा आलाप, जोड-झाला यांना एकत्र करून जोरकसपणे सादर केलेल्या ‘तानम’ने तंतकारीचा आनंद रसिकांनी घेतला. घटमवादक त्रिची कृष्णस्वामी आणि मृदंगमवादक विद्वान जयचंद्रराव यांच्या शैलीदार वादनातून रंगलेल्या जुगलबंदीचा नाद बराच काळ स्वरांगणातील रसिकांच्या कानोकानी गुंजत राहिला.

उत्तरार्धात गायिका अर्चना कान्हेरे यांनी जोगकंस रागात एकताल आणि त्रितालातील बंदिशी, तसेच त्रिताल आणि झपतालातील बंदिशींतून शैलीदार गायकीचे दर्शन दिले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या नाट्यगीताने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि तबल्यावर भरत कामत यांनी साथसंगत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com