Sawai Gandharva Mahotsav : काळाच्या पडद्याआड गेलेल्या दिग्गजांच्या आठणींना मिळणार उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sawai Gandharva Mahotsav

Sawai Gandharva Mahotsav : काळाच्या पडद्याआड गेलेल्या दिग्गजांच्या आठणींना मिळणार उजाळा

Sawai Gandharva Mahotsav : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवादरम्यान होणा-या षड्ज, अंतरंग आणि ‘शताब्दी स्मरण’ या चित्रप्रदर्शनाची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. त्यानंतर सतीश पाकणीकर यांनी यंदाच्या छायाचित्र प्रदर्शनाची माहिती पत्रकारांना दिली.

येत्या १४ ते १८ डिसेंबर दरम्यान ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी होणार असून याच दरम्यान शिवाजीनगर येथील राहुल थिएटर शेजारी असणा-या सवाई गंधर्व स्मारक या ठिकाणी दि. १४, १५ व १६ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते १ या वेळेत षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम पार पडतील. शिवाय महोत्सवादरम्यान दरवर्षी आयोजित करण्यात येणारे ‘शताब्दी स्मरण’ हे चित्रप्रदर्शन देखील या वेळी वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

षड्ज, अंतरंग या विषयी

दिवस पहिला – १४ डिसेंबर, २०२२

संगीतमार्तंड पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराजांच्या आठवणींना उजाळा देतील.

दिवस दुसरा – १५ डिसेंबर, २०२२

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन दुस-या दिवशी करण्यात येईल. या चित्रपटाची निर्मिती आर्य संगीत प्रसारक मंडळाने केली आहे.

दिवस तिसरा – १६ डिसेंबर, २०२२

महान सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आलम खाँ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होईल. आलम खाँ हे मेहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक असून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संपन्न होणाऱ्या या वर्षीच्या महोत्सवात दर वर्षीप्रमाणे प्रकाशचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी हे प्रदर्शन पं. भीमसेन जोशी यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित असेल. प्रकाशचित्रात टिपला गेलेला प्रत्येक क्षण आपल्याला पुन्हा तो क्षण जगण्याचा आनंद देतो. प्रकाशचित्राचे हे सामर्थ्य या प्रदर्शनातून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार असल्याचं प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी सांगितलं.

दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रातून आपल्याला यावर्षी देखील काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल परत एकदा अनुभवायला मिळणार आहे.

टॅग्स :musicMusic Concert