७८ केंद्रांवर होणार शिष्यवृत्ती सराव परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

अशी होईल परीक्षा
शासकीय परीक्षेप्रमाणे व त्या वेळापत्रकाप्रमाणे ७५ प्रश्‍नांची १५० गुणांची ही परीक्षा होणार असून, पहिला पेपर प्रथमभाषा व गणित, वेळ सकाळी अकरा ते साडेबारा आणि दुसरा पेपर तृतीयभाषा व बुद्धिमत्ता चाचणी वेळ दीड ते तीन या वेळात होईल. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांनी सकाळी साडेदहा वाजता परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्‍यक आहे.

पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवारी (ता. ९) ७८ केंद्रावर होणार आहे. यावर्षी विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाली असून, १२ हजार ७७७ जणांनी नोंदणी केली आहे. मुख्य व सराव परीक्षेस सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील, याची दक्षता शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित वर्ग शिक्षकाने घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायमस्वरूपी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती मुख्य परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याअगोदर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुख्य परीक्षेचा सराव होण्यासाठी सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. सराव व मुख्य परीक्षेची सर्व तयारी झाली असून, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, फिरते तपासणी पथक यांचे नियोजन केल्याची माहिती समन्वयक सुभाष सूर्यवंशी यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ‘puppss.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट शाळेच्या लॉगिन वर उपलब्ध करण्यात आले आहे. दोन्ही परीक्षेसाठी हॉलतिकीट विद्यार्थ्यांकडे असणे अनिवार्य आहे. मुख्याध्यापकांनी वेबसाइटवरून हॉल तिकिटाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी. मुख्य परीक्षेच्या वेळापत्रक प्रमाणे सराव परीक्षेच्या पेपरचे वेळापत्रक राहील याची नोंद घ्यावी. 

या वर्षी नऊशे विद्यार्थी वाढल्याने गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा केंद्रांची संख्या वाढली आहे. ज्या शाळा ‘परीक्षा केंद्र’ आहेत. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी केंद्र संचालकांना आठ फेब्रुवारी सराव व १५ फेब्रुवारी रोजी मुख्य परीक्षेचे पूर्व नियोजन करण्यासाठी सहकार्य करावे, ही परीक्षा राज्यस्तरीय असल्याने परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय इमारतीची स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, शाळेतील शिपाईदेखील उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांनी केल्या आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarship Practice Examination will be held at 78 centers