‘स्कूल बस’ चालकांची आरोग्य तपासणी करायणी कोणी?

‘स्कूल बस’ चालकांची आरोग्य तपासणी करायणी कोणी?
Published on: 

पिंपरी, ता. १६ : तापकीर चौकाजवळ सोमवारी (ता.१२) एका स्कूल बसचा अपघात झाला. या चालकाला झटके आल्यामुळे ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, अशा वाहनचालकांच्या आरोग्य तपासणीचा प्रश्‍न यानंतर ऐरणीवर आला आहे. तर, ही जबाबदारी कोणाची? यावरून शिक्षण विभाग आणि परिवहन विभाग यांच्या नियमांतील त्रुटी उघड झाल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात खासगी आणि महापालिकेच्या मिळून सुमारे ६६५ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. यात सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. काही खासगी शाळांनी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्या आहेत. काही शाळांनी बस चालकांसोबत करार केले आहेत. या व्यतिरिक्त व्हॅन आणि रिक्षांमधूनही विद्यार्थांची वाहतूक केली जाते. शहर आणि परिसरात अशा सुमारे पाच हजार वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात आहे. यातील बहुतांश चालकांचे वय ४० वर्षांपेक्षा अधिक आहे. वयाचा हा टप्पा पार केल्यानंतर शरीरात नैसर्गिक आणि संप्रेरकीय बदल होतात. या वयात जीवनशैली, आहाराच्या सवयी आणि अनुवांशिकता यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधे सुजणे या समस्या सुरू होतात. रक्तदाब किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीच्या वाहन चालकांची नियमित आरोग्य तपासणी आवश्‍यक आहे. पण, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच तपासणी करायची कोणी? शाळांनी, शालेय शिक्षण विभागाने? की आरटीओ प्रशासनाने? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शालेय बस नियमन (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाने शालेय बस नियमन (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू केले आहेत. यामध्ये सर्व शालेय बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस विथ पॅनिक बटन’, चालकांना वाहनांचे थेट लोकेशन दर्शविणारी मोबाईल ॲप सुविधा, विद्यार्थ्यांच्या डिजिटल उपस्थितीची नोंद, पालकांना सूचना देणारी प्रणाली, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम, सीसीटीव्ही , डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम बसविणे बंधनकारक आहे.

अपघाताच्या घटना
- ४ जुलै २०२४ : आळंदी-मरकळ रस्ता दाभाडे सरकार चौकाजवळ शालेय बसचा अपघात
- २३ सप्टेंबर २०२५ : चिंचवड लिंक रोड येथून पुनावळ्याकडे जाणारी स्कूल व्हॅन बेदरकारपणे चालवतानाचा चालकाचा व्हिडिओ व्हायरल
- २० ऑगस्ट २०२६ : ३५ विद्यार्थ्यांना शाळेत काळाखडक परिसराकडे जाताना भूमकर चौकात स्कूल बसला आग
- १२ ऑक्टोबर २०२६ : शालेय विद्यार्थी वाहतूक बस बीआरटी मार्गाच्या गर्डरला धडकून अपघात

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबतची नियमावली आरटीओने शिक्षण विभागाला दिली पाहिजे. त्यानुसार आम्ही शाळांकडून त्याची अंमलबजावणी करून घेऊ.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील चालकांची आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे अपघात टाळता येतील.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना, आरटीओ आणि शाळांनी मिळून चालकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले पाहिजेत. चालकांनीदेखील स्वतःसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वत:ची आरोग्य तपासणी नियमितपणे केली पाहिजे.
- सुनील लांडगे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड स्कूल बस असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com