दाखल्याअभावी सोडली शाळा; भाऊ-बहीण शिक्षणापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

शिक्षण हमी कायदा अमलात आणण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या मोहननगर शाळेत स्थलांतरित मुलांना दाखल्याअभावी प्रवेश नाकारल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. 

पिंपरी - शिक्षण हमी कायदा अमलात आणण्यात आला आहे. मात्र, महापालिकेच्या मोहननगर शाळेत स्थलांतरित मुलांना दाखल्याअभावी प्रवेश नाकारल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

६ ते १४ या वयोगटातील सर्व मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी सरकारने आरटीईअंतर्गत कायदा आणला. शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीमदेखील वर्षभर शिक्षण विभागाकडून राबविण्यात येते. परंतु, काही असंवेदनशील शिक्षकांमुळे काही मुले शिक्षणाच्या प्रवाहात येत नसल्याचा प्रकार महापालिकेच्या मोहननगरच्या कांतिलाल खिंवसरा शाळेत घडला. सकाळ व दुपारच्या सत्रात दोन भावंडांना दाखल्याअभावी प्रवेश नाकारला आहे. मूळ उमरगा तालुक्‍यातील (जि. उस्मानाबाद) कामानिमित्त शहरात स्थलांतरित कुटुंबातील अक्षय व अक्षरा दयानंद सरोदे अशी या भावंडांची नावे आहेत. अक्षयला पहिलीसाठी, तर अक्षरा हिला चौथीसाठी दाखल करण्यासाठी जवळच्या सरकारी शाळेत नेले होते.

कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘शिक्षण हमी कार्ड’ दिले जाते. त्यानुषंगाने शहरात इतर जिल्ह्यांतून किंवा राज्यातून काही कामानिमित्त अशी कुटुंबे येत असतात. त्यांच्यासोबत ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांना आरटीईनुसार नियमित शाळेत दाखल करावे लागते.

कायद्याने मुलांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे मुख्याध्यापकांना प्रवेश नाकारता येत नाही. दाखले नंतर मागवून घेता येतात.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School dropped out due to lack of certification