
कोरोनामुळे तीन वर्षाच्या खंडानंतर शहरातील संशोधन आणि शैक्षणिक संस्थांनी विज्ञान दिनानिमित्त विशेष आयोजन केले होते.
Science Day Celebration : पुणेकरांचा विज्ञान दिन उत्साहात साजरा
पुणे - जादुई वाटणारा प्लाझ्मा ग्लोब, कधीही न पाहिलेले जिवाश्म, इस्रोचे प्रक्षेपक अग्निबाण, भौतिकशास्राचे नियम सांगणारे दोलक, द्रवरूप नायट्रोजनची भन्नाट सफर, जेम्सवेब टेलिस्कोप आणि वैज्ञानिक खेळांच्या गमतीने पुणेकरांचा विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला.
कोरोनामुळे तीन वर्षाच्या खंडानंतर शहरातील संशोधन आणि शैक्षणिक संस्थांनी विज्ञान दिनानिमित्त विशेष आयोजन केले होते. देशातील सर्वाधिक संशोधन संस्था आणि शैक्षणिक संकुले पुणे शहरात आहे. त्यामुळे विज्ञान दिन म्हणजे शहरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी एक पर्वणीच असते. पुण्यासह राज्यभरातून अनेक शाळांनी विज्ञान दिनासाठी सहलींचे आयोजन केले होते. बहुतेक संशोधन संस्थांनी प्रदर्शने, व्याख्याने, चर्चासत्रे आणि विज्ञान खेळांचे भरगच्च आयोजन केले होते.
विद्यापीठ परिसर बहरला -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शेकडो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. शाळा व महाविद्यायीन विद्यार्थ्यांच्या आगमनाने विद्यापीठ परिसर बहरलेला पाहायला मिळाले. सायन्स पार्क, भौतिकशास्र विभाग, मानवशास्र विभाग, आदी विभागांतील प्रदर्शनांना विद्यार्थ्यानी विशेष गर्दी केली होती. मानवशास्त्र विभागाच्या इरावती कर्वे संग्रहालयात मानवी उत्क्रांतीमधील जीवाश्म विज्ञान आणि मानवी अस्थी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच जैवतंत्रज्ञान विभागाने देखील वैज्ञानिक खेळ, स्पर्धा आणि प्रयोग, पोस्टर्स, तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून जैतंत्रज्ञान विषयातील विज्ञानाची माहिती दिली. वनस्पती शास्त्र विभागाने जैवविविधता, कंपोस्टचे महत्व, औषधी वनस्पती, भरड धान्य आणि त्याची उपयुक्तता, ग्रीन हाऊस मॉडेल याची माहिती देत विज्ञान दिवस साजरा केला.
राष्ट्रीय संशोधन संस्थांत प्रदर्शने -
पाषाण रस्त्यावरील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील इंदिरा बालन सायन्स ॲक्टीवीटी सेंटरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर, प्रगत संगणन विकास केंद्राने सुपर कंप्युटर, लॅंग्वेज कंप्युटींग, मेडिकल ॲन्ड बायोइन्फॉर्मेटीक ॲप्लिकेशन आदीसंदर्भात माहिती दिली. नागरिकांनी दोनही संस्थांना भेट देत व्याख्याने आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) विज्ञान दिनानिमित्त आयआयटी मुंबईचे रसायनशास्रज्ञ डॉ. अरिंदम चौधरी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. विपीठाच्या आवारात असलेल्या राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेने आपल्या प्रयोगशाळा विज्ञान प्रेमींसाठी खुल्या केल्या होत्या. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने खोडद येथे जीएमआरटी दूर्बिणीजवळ मोठ्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

‘आयुका’ बंद असल्याने हिरमोड...
आंतरविद्यापीठीय खगोलशास्र आणि खगोलभौतिकी केंद्राने रविवारी (ता.२६) विज्ञान दिन साजरा केला होता. त्यामुळे आज कोणतेच विशेष आयोजन नसल्याने अनेक विज्ञान प्रेमी नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. विद्यापीठातील प्रदर्शने पाहून आल्यानंतर अनेक विद्यार्थी आयुकाच्या आवारात रेंगाळत होते.