#SciencePark विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’चे नव्या प्रशस्त वास्तूत होणार स्थलांतर

puneuniversity_6.jpg
puneuniversity_6.jpg

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’चे नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतर होणार आहे. तिथे मोठ्या आकाराच्या प्रतिकृती असतील तसेच, तेथील प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना मुक्तपणे प्रयोग करता येणार आहेत. हे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील पहिलेच ‘सायन्स पार्क’ आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्यास मदत होणार आहे.

‘सायन्स पार्क’ हे सध्या साडेतीन हजार चौरस फुटांच्या दालनात आहे. त्याच्यासाठी आता १५ हजार चौरस फुटांचे क्षेत्रफळ असलेली स्वतंत्र दुमजली इमारत उभारण्याचे काम सुरू असून, येत्या ऑक्टोबरपर्यंत ‘सायन्स पार्क’चे स्थलांतर होईल, अशी माहिती सायन्स पार्कचे संचालक डॉ. डी. जी. कान्हेरे आणि वरिष्ठ संशोधक डॉ. हर्षदा बाबरेकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागरूकता निर्माण करणे, असलेली उत्सुकता आणखी वाढवणे आणि नागरिकांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा उलगडा करून देणे या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाच वर्षांपूर्वी ‘सायन्स पार्क’ची स्थापना करण्यात आली. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे केंद्र सध्या विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात साडेतीन हजार चौरस फुटांच्या जागेत आहे. मात्र, त्याच्यासाठी स्वतंत्र दुमजली इमारत उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. या भव्य वास्तूमुळे विज्ञानविषयक मोठ्या प्रतिकृती ठेवता येणार आहेत. त्यात मुलांना पाहता येतील, खेळता येतील अशी- डीएनएचे ८ फुटी प्रतिकृती, वाळवीचे पाच फूट उंचीचे घर व त्याची अंतर्गत रचना, १० फूट उंचीचे बोलका वृक्ष, आठ फूट उंचीचा लाकडी सूक्ष्मदर्शकाची (मायक्रोस्पोक) प्रतिकृती अशा गोष्टी ठेवण्यात येणार आहेत.

याचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुण्यातील सर्वांत मोठे ‘सायन्स पार्क’ असेल, त्यात संग्रहालय तर असेलच, शिवाय प्रयोग करण्याची व्यवस्थासुद्धा असणार आहे. नव्या जागेचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठे प्रयोग प्रदर्शित करणे शक्य आहे. याशिवाय विविध परिसंस्थांच्या संवादी प्रतिकृती (Interactive Models) मॉडेल तयार करता येतील. या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील, असेही डॉ. कान्हेरे यांनी सांगितले.

‘सायन्स पार्क’मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी २० आठवड्यांचे ‘हॅन्ड्स ऑन ट्रेनिंग’ घेतले जाते. त्यासाठी विद्यार्थी आठवड्यातून एकदा सायन्स पार्कमध्ये येतात आणि प्रयोग करत विज्ञान समजून घेतात. त्यात तिन्ही बोर्डांच्या (राज्य बोर्ड, केंद्रीय बोर्ड, इंचरनॅशनल बोर्ड) शाळेतील अभ्यासक्रमावर आधारित प्रयोग करून घेतले जातात. त्यात विविध विषयांवरील प्रयोग हाती घेतले जातात.

त्यापैकी काही पुढीलप्रमाणे -
-  माणसाचा बोलता सापळा. तो शरीरातील हाडांची माहिती देतो.
-  पोटातील अन्नाचा प्रवास, श्वासोच्छवासाची प्रक्रिया, आदींच्या प्रतिकृती.
- चरख्यापासून वीजनिर्मिती मॉडेल.
-  स्वत:चा आवाज पाहण्याचे मॉडेल.
- तबला, एकतारा कसे काम करतात याचे सिग्नल छोट्या टीव्ही स्क्रीनवर (ऑसिलोस्कोप) दाखवतात.
- ढगांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या वीजेचे मॉडेल.
- वेगवेगळ्या कोनांमध्ये ठेवलेले आरशांमध्ये किती प्रतिमा दिसतात.
- मॅग्नेटिक गन (चुंबकीय बंदूक) याची क्रिया.
- लिफ्टमध्ये फोन का चालत नाहीत याचा प्रयोग.
-अंतर्वक्र व बहिर्वक्र आरसे
- जादूच्या काही प्रयोगांमधील विज्ञान.
- वेगवेगळ्या किड्यांचा संग्रह व त्यांच्यातील विविधता.
- आपल्या डोळ्यांना बुरशी कशी दिसते.
- मायक्रोबायोलॉजी लॅब - शरीरावर बुरशी कशी वाढते याचा प्रयोग करता येतो.
- वेगवेगळे पक्षी- त्यांचे पाय व त्यांच्या चोचींच्या प्रतिकृती केल्या आहेत.


प्रत्येक वर्षी विज्ञानासाठीची नोबेल पारितोषिक कोणाला व कोणत्या विषयांसाठी दिली गेले हे सामान्य नागरिकांना सांगण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात. हा उपक्रम मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या सहकार्याने हाती घेतला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com