मायफा-१८ ऑगस्ट

मायफा-१८ ऑगस्ट
Published on

सूचना - प्राजक्ता सहस्रबुद्धे यांचा लेख मेन करावा. रविशंकर आणि संजय जानवळे यांचे लेख उजवीकडे दोन कॉलमांत वापरावेत.
--------------------------
मायफा, १७ ऑगस्टच्या अंकासाठी
---------------
आरोग्याचे ‘बाळ’कडू... लोगो
डॉ. संजय जानवळे

लहान मुले आणि कर्करोग
आपल्या देशात लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे ‘लॅन्सेट’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधन अभ्यासात दिसून आले. ‘सार्क’चे सदस्य असलेल्या आठ देशात ० ते १४ वर्षे या वयोगटात कर्करोगाचे सुमारे ३७ हजार ७१६ नवीन रुग्ण आढळले असून, त्यापैकी सुमारे २५ हजार ९३९ रुग्ण हे एकट्या भारतात दिसून आले. लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी खूप जास्त आहे असे म्हणता येणार नाही; पण आहे ते प्रमाणही चिंताजनक आहे. बालकांत ल्युकेमिया या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून त्यापाठोपाठ मेदू व मज्जासंस्थेच्या कर्करोगाचा क्रमांक लागतो. आजच्या या लेखात लहान मुलात आढळणार्या ल्युकेमिया या कर्करोगाविषयी..
‘ल्युकेमिया’ या गटात मोडणाऱ्या कर्करोगामध्ये शरीराच्या बोन मॅरो या भागात मोठ्या प्रमाणावर असाधारण पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती होत असते. मुळात या बोन मॅरोचे महत्त्वाचे कार्य म्हणजे लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्तपेशी (व्हाइट ब्लड सेल्स) या पेशींची निर्मिती करणे, हे आहे. शरीरात होणाऱ्या जंतुसंसर्गाचा (इन्फेक्शन) सामना करण्याचे कार्य या पांढऱ्या रक्तपेशी करत असतात.
ल्युकेमियाग्रस्त रुग्णात एकीकडे पांढऱ्या भिन्न व असाधारण पेशींची वाढ वेगात होत असताना, दुसरीकडे त्याच बोन मॅरोतील लाल रक्तपेशी व प्लेटलेट्सची निर्मिती मंदावते.
‘ॲक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’, हा लहान मुलांत सर्वाधिक आढळणारा ल्युकेमियाचाच एक प्रकार आहे. सुरुवातीला या रोगाची लक्षणे सौम्य असली, तरी हा रोग झपाट्याने वाढत जातो. अखेरीस या कर्करोगग्रस्त रुग्णाची अनेक संसर्गजन्य रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती क्षीण होते. अशा ल्युकेमियाचे निदान होणे, ही त्या मुलाच्या कुटुंबात मनोधैर्य उद्ध्वस्त करणारी घटना असते. ल्युकेमियावरचे खर्चिक उपचार कुटुंबाला खचितच परवडणारे असतात. कर्करोगतज्ज्ञ (ऑँन्कोलाॅजिस्ट) तपासण्या करतात, उपचार सुचवितात. उपचार करणऱ्यांत मग त्यांच्या बरोबरच बालरोगतज्ज्ञ, नर्सेस, सायकोलाॅजिस्टचा यांचा समावेश असतो. उपचारांत किमोथेरपी, गरज भासल्यास रेडिओथेरपी या उपचार पद्धतींचा समावेश करावा असतो.

लक्षणे
ल्युकेमियाच्या प्रकारानुसार लक्षणे आढळून येतात. सुरुवातीला रुग्णात असलेल्या सौम्य प्रकारच्या लक्षणांची तीव्रता नंतर वेगाने वाढत जाते. त्यात १) वजनात घट, २) अशक्तपणा, ३) सौम्य ताप, ४) हाडे किंवा सांधे दुखणे, ५) ॲनिमिया (हिमोग्लोबिनची कमतरता), ६) प्लेटलेट्सची निर्मिती घटल्याने थोडे खरचटले, तरी रक्तस्राव होणे, ७) जंतुसंसर्ग - तोंड येण्यापासून ते तीव्र न्युमोनियासारखे आजार उद्‍भवणे, अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय ल्युकेमियाच्या त्या- त्या प्रकारांनुसार अन्य काही लक्षणे आढळून येतात.
ल्युकेमियाच्या, गुंतागुंती, त्याचे निदान आणि उपचार यांच्याविषयी पुढील भागात माहिती घेऊ.
(क्रमशः)
--------------
अस्थिबोध... लोगो
डॉ. अजय कोठारी

वाकलेला कणा
सरळ करण्यासाठी
‘‘डॉक्टर, माझ्या मुलाचा कणा वाकलेला दिसतोय. हे गंभीर आहे का?’’ हा प्रश्न अनेक पालक विचारतात. काही वेळा मुलांच्या खांद्यांची उंची वेगळी दिसते, काहींची पाठ एका बाजूला उंच वाटते, तर काहींमध्ये कपडे घातल्यावर शरीराचा समतोल बिघडलेला जाणवतो. अनेकदा सुरुवातीला वेदना नसल्यामुळे या बदलांकडे दुर्लक्ष केलं जातं; पण काही रुग्णांमध्ये हा वाकलेपणा हळूहळू वाढू शकतो. कण्याच्या या असामान्य वाकण्याला स्कोलिओसिस (Scoliosis) म्हणतात.
प्रत्येक स्कोलिओसिसला शस्त्रक्रियेची गरज नसते. मात्र, काही निवडक रुग्णांमध्ये योग्य वेळी उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

स्कोलिओसिस म्हणजे नेमकं काय?
सामान्यतः पाठीचा कणा समोरून पाहिल्यास सरळ दिसतो. स्कोलिओसिसमध्ये मात्र कणा एका बाजूला वाकतो आणि काही वेळा त्याच्यासोबत फिरतोही(Rotation). यामुळे :
• खांद्यांची उंची वेगळी दिसू शकते
• कंबर असमान दिसू शकते
• बरगड्या एका बाजूला उठून दिसू शकतात
• शरीराचा समतोल बदलू शकतो
काही रुग्णांमध्ये हा बदल सौम्य असतो, तर काहींमध्ये तो कालांतराने वाढू शकतो.

स्कोलिओसिस का होतो?
अनेक रुग्ण आणि पालकांचा पहिला प्रश्न असतो, ‘‘हे नेमकं कशामुळे झालं?’’ खरं म्हणजे बहुतेक मुलांमध्ये स्कोलिओसिसचं अचूक कारण सापडत नाही. यालाच Idiopathic Scoliosis म्हणतात. याशिवाय :
• जन्मजात विकृती
• न्यूरोलॉजिकल आजार
• स्नायूंचे विकार
• काही आनुवांशिक कारणं
यांमुळेही स्कोलिओसिस होऊ शकतो.

स्कोलिओसिसची लक्षणं कोणती?
सुरुवातीच्या टप्प्यात अनेक रुग्णांना कोणताही त्रास जाणवत नाही. मात्र, खालील बदल दिसू शकतात :
• एक खांदा दुसऱ्यापेक्षा उंच दिसणं
• शरीर एका बाजूला झुकलेलं वाटणं
• कपडे नीट बसत नसणं
• कमरेची रेषा असमान दिसणं
• पुढे वाकल्यावर पाठीचा एक भाग जास्त उठून दिसणं
काही मोठ्या वयाच्या रुग्णांमध्ये पाठदुखी किंवा थकवाही जाणवू शकतो.

प्रत्येक स्कोलिओसिसला ऑपरेशन लागतं का?
नाही. ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक रुग्णांमध्ये यांच्या मदतीने स्थिती नियंत्रित ठेवता येते:
• नियमित तपासणी
• निरीक्षण (Observation)
• व्यायाम
• काही परिस्थितीत ब्रेस

कण्याचा वाकलेपणा किती आहे आणि तो वाढतो आहे का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असतं. म्हणून स्कोलिओसिसचं निदान झालं म्हणजे लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल, असं अजिबात नाही.

शस्त्रक्रियेचा विचार
काही परिस्थितींमध्ये शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ,
• वाकलेपणा सतत वाढत असणं
• वक्रता गंभीर स्वरूपाची असणं
• शरीराचा समतोल मोठ्या प्रमाणात बिघडणं
• श्वासोच्छवासावर परिणाम होण्याची शक्यता
• दैनंदिन जीवनावर परिणाम होणं
प्रत्येक रुग्णाचा निर्णय वेगळा असतो. फक्त एक्स-रेवरील आकडा पाहून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात नाही.

शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट
अनेक रुग्णांना वाटतं, की शस्त्रक्रियेमध्ये कणा पूर्णपणे सरळ केला जातो. प्रत्यक्षात उद्दिष्ट असतं:
• वाकलेपणा शक्य तितका दुरुस्त करणं
• पुढील वाढ थांबवणं
• शरीराचा समतोल सुधारणं
• कण्याला स्थिरता देणं
यासाठी विशेष स्क्रू, रॉड आणि इतर तंत्रांचा वापर केला जातो. प्रत्येक शस्त्रक्रिया रुग्णाच्या वय, वक्रतेचा प्रकार आणि गांभीर्य यानुसार नियोजित केली जाते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्कोलिओसिस सर्जरी अधिक सुरक्षित झाली आहे. स्कोलिओसिस सर्जरी ही स्पाईन सर्जरीतील अत्यंत नियोजनबद्ध शस्त्रक्रियांपैकी एक मानली जाते. आज O-Arm, Navigation आणि Neuromonitoring सारख्या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अधिक अचूक माहिती मिळू शकते.
यामुळे :
• स्क्रूची अचूक मांडणी करता येते
• सुरक्षितता वाढते
• शस्त्रक्रियेचं नियोजन अधिक प्रभावी होतं
आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक जटिल शस्त्रक्रिया अधिक आत्मविश्वासाने करता येत आहेत.

शस्त्रक्रियेनंतरचं आयुष्य कसं असतं? पालक आणि रुग्णांचा हा स्वाभाविक प्रश्न असतो.
बहुतेक रुग्णांमध्ये योग्य पुनर्वसनानंतर :
• दैनंदिन कामं करता येतात
• शिक्षण किंवा नोकरी सुरू ठेवता येते
• सामान्य जीवन जगता येतं
पुनर्वसनाचा कालावधी प्रत्येक रुग्णामध्ये वेगळा असू शकतो. म्हणून शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याचं पालन करणं महत्त्वाचं असतं.

वेळेवर घेतलेला निर्णय महत्त्वाचा
स्कोलिओसिस म्हणजे फक्त दिसण्याचा प्रश्न नाही; काही रुग्णांमध्ये तो कण्याच्या आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतो. मात्र, प्रत्येक वाकलेला कणा शस्त्रक्रियेची मागणी करत नाही.
लक्षात ठेवा, स्कोलिओसिस शस्त्रक्रियेचा उद्देश केवळ कणा सरळ करणं नसतो; तर रुग्णाला संतुलित, कार्यक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य देणं असतं. योग्य वेळी निदान, नियमित फॉलो-अप आणि आवश्यक असल्यास योग्य शस्त्रक्रिया, यामुळे अनेक रुग्ण दीर्घकाळ चांगलं आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात.
------------
आरोग्य‘चेतना’... लोगो
डॉ. जयदेव पंचवाघ

मागच्या आठवड्यात आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि योग्य वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर गंभीर परिस्थिती निर्माण करणाऱ्या आजाराबद्दल माहिती घेत होतो. त्याचाच हा पुढचा भाग.
‘कॉडा इक्वायना सिंड्रोम’ होण्याचं अगदी नेहमी दिसणारं कारण म्हणजे कंबरेच्या दोन मणक्यांमधील डिस्क घसरणं. (स्लिप्ड डिस्क, प्रोलॅप्स्ड इंटर व्हर्टिब्रल डिस्क-PID). आपल्याला माहितीच आहे, की
डिस्क घसरल्यामुळे सर्वसाधारणपणे कंबरदुखी किंवा सायटिकासारखे त्रास होतात. मात्र, काही वेळा डिस्कचा मोठा भाग घसरला आणि तीव्र दाब आला, तर गंभीर परिस्थिती म्हणजे ‘कॉडा इक्वायना सिंड्रोम’ उद्‍भवू शकते.
या आजाराचं दुसरं कारण म्हणजे ही ‘घोड्याची शेपटी’ अर्थात कॉडा इक्वायनातील नसांचा पुंजका ज्या ‘कॅनाल’मध्ये असतो, त्याचा आकार जन्मतःच लहान असणं- जन्मतःचा कॅनाल स्टेनोसिस! (स्टेनोसिस म्हणजे एखाद्या पाईपच्या आतली जागा आकुंचन पावणं).
वय वाढेल तसं स्पाँडिलोसिसच्या थोड्यासुद्धा प्रक्रियेनं या नसांवर दाब येतो. अशा केसेसमध्ये लक्षणं तुलनेनं हळूहळू वाढतात; पण अशा आकुंचन पावलेल्या जागेमध्ये अचानक डिस्कचा तुकडा घसरून घुसला, तर ‘दुष्काळात तेरावा महिना’ झाल्याप्रमाणे नसा तीव्रतेनं दाबल्या जातात. कधी कधी या भागात मणक्याला फ्रॅक्चर होऊन त्याचा तुकडा आत घुसल्यामुळेसुद्धा हा लक्षणसमूह दिसू शकतो. मणक्याच्या या भागात होणाऱ्या गाठी किंवा जंतुसंसर्ग ही क्वचित दिसणारी कारणं.
‘कॉडा इक्वायना सिंड्रोम’मध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तातडीनं उपचार करावे लागतात. तसंही सर्वसाधारणपणे, ज्या मणक्याच्या आजारांमध्ये लवकर शस्त्रक्रियेची गरज असते त्याचे रुग्णसुद्धा विविध उपचारांच्या मागे बहुमूल्य वेळ वाया घालवताना दिसतात. इथं मात्र तातडीनं व योग्य प्रकारे शस्त्रक्रिया न झाल्यास, दाबल्या गेलेल्या नसांची कार्यं कायमचीच नष्टं होऊ शकतात. ‘शस्त्रक्रियेशिवाय’ अशी उपाधी लावून पुढे ‘अत्याधुनिक’ वाटणारं नाव दिलेल्या केंद्रात वेळ व इतर गोष्टी घालवण्याची मुभा इथे नसते हे नीट समजून घेणं गरजेचं आहे.
एखादं झाड ‘वठतं’ तेव्हा वठण्याची प्रक्रिया चालू असताना त्या झाडाला योग्य वेळात पाणी मिळालं, तर पुन्हा पालवी फुटू शकते आणि झाडाचा जीव वाचू शकतो; पण विशिष्ट वेळ गेल्यावर, कितीही पाणी दिलं तरी उपयोग होत नाही. अगदी तशीच परिस्थिती या केसेसमध्ये नसांची होते. त्यामुळे, लक्षणं सुरू झाल्यानंतर ते नसांवरचा दाब काढेपर्यंतचा काळ महत्त्वाचा असतो आणि हा काळ किती कमी आहे यावर शस्त्रक्रियेचं यश अवलंबून आहे.
मणक्याच्या सर्व आजारांत शस्त्रक्रियेची गरज असतेच असं नाही हे खरं आहे; पण ज्या आजारांमध्ये ती निकडीची असते तिथे साध्या मराठीत ‘फालतूपणा’ करण्यात वेळ घालवण्यात धोका असतो हे स्पष्टपणे समजणं गरजेचं आहे. हा शब्द मी जबाबदारीनं आणि अनुभवांती वापरतो आहे.
मणक्याच्या आजारांवर उपचार करणं हे शास्त्र आहे. न्यूरोसर्जरीच्या अभ्यासक्रमात तीन ते पाच वर्षं प्रशिक्षण दिलं जावं इतकं हे शास्त्र खोल आहे, हे लक्षात ठेवलं तरी बऱ्याच रुग्णांना फायदा होईल, असं मला अनेकदा वाटतं. दुर्दैवानं मसाज, व्यायाम, मशीनमध्ये घालून ओढाताण, एआय किंवा लेझर असं नाव दिलेले उपचार अशा अनेक सेंटर्सचं पीक आलेलं गल्लीगल्लीत दिसतं.
यातून अनेक लोकांची हौस पूर्ण होते आणि फार गंभीर आजार नसल्यास तात्पुरतं बरं वाटू शकतं; पण सांगण्याचा मुद्दा असा, की नसांवर गंभीर दाब असल्यास कृपया या हौशी पूर्ण करण्यात, वेळ आणि बरं होण्याची शक्यता या दोनही घालवून बसू नका. ‘कॉडा इक्वायना’ सिंड्रोम या प्रकारात मोडतो! ‘व्यायामानं बरं वाटलं नाही, तर नंतर बघू’ या प्रकारात नाही!!
गेल्या काही वर्षांत एमआरआय तपासणीमुळे या आजाराचं निश्चित कारण आज काही मिनिटांतच समजण्याची आणि त्यावरचे उपाय करण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचप्रमाणे काही व्यक्तींच्या एमआरआयमध्ये ही परिस्थिती उद्‍भवण्याची खूपच जास्त शक्यता आहे असा स्पष्ट निष्कर्ष आधीच दिसू शकतो. ‘टाइम इज मनी’ असं म्हणतात. या आजारात ‘टाईम इज नर्व्ह’ असं म्हणायला पाहिजे.
‘कॉडा इक्वायना सिंड्रोम’ म्हणजेच मणक्यातील घोड्याच्या शेपटीवरील दाब समजून घेणं याच कारणासाठी महत्त्वाचं आहे आणि असं झाल्यास तातडीनं योग्य आणि अनुभवी टीमकडून शस्त्रक्रियेनं हा दाब काढणं नितांत गरजेचं आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियांच्या क्षेत्रात अशा काही असतात, की त्या ‘वेळेत’ आणि योग्य पद्धतीनं करणं फार महत्त्वाचं असतं. त्यातल्या मानेच्या मज्जारज्जूवर येणाऱ्या दाबाविषयी मी पुढच्या आठवड्यात लिहिणार आहे.
मणक्याच्या आजारांवर उपचार घेताना तुम्ही आम्हाला शस्त्रक्रियेतल्या धोक्यांविषयी विचारता (आणि ते योग्यही आहे.), अगदी तसंच, शस्त्रक्रियेविना उपचार करताना ‘मला शस्त्रक्रियेची गरज आहे का? ती तातडीनं करण्याची गरज आहे का? शस्त्रक्रिया ‘न करण्यात’ काही धोके आहेत का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमचं शिक्षण आणि अनुभव सक्षम व अस्सल आहेत का?’... हे प्रश्नसुद्धा प्रगल्भ रुग्णांनी विचारणं गरजेचं बनत चाललं आहे!
---------
जीवनमान-जीवनभान... लोगो
डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी)

व्हेरिकोज व्हेन्स :
लक्षणे ओळखा; गुंतागुंत टाळा
दिवसभर उभे राहिल्यानंतर पाय जड वाटणे, घोट्याजवळ सूज येणे किंवा पायांवर निळ्या-हिरव्या शिरा दिसू लागणे - आपण अनेकदा या लक्षणांकडे केवळ थकवा किंवा वयाचा परिणाम म्हणून पाहतो. मात्र, हीच लक्षणे पुढे व्हेरिकोज व्हेन्सची सुरुवात असू शकतात. विशेषतः दीर्घकाळ उभे राहावे लागणाऱ्या व्यक्तींनी याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमके काय, त्या का होतात आणि साध्या उपायांनी त्यांचा धोका कसा कमी करता येतो, हे जाणून घेऊया.

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे नेमके काय?
रक्तवाहिन्यांचे दोन मूलभूत प्रकार असतात- धमन्या आणि शिरा (व्हेन्स). धमन्या शुद्ध, तर शिरा अशुद्ध रक्त वाहून नेतात. शिरांमधील रक्ताचे प्रेशर दीर्घकाळासाठी वाढते, तेव्हा त्यांच्या पेशी अतिरिक्त ताणल्या जातात आणि भिंती कमजोर होतात. यामुळे त्यांचा आकार बिघडतो आणि परिणामी व्हेन्समधील व्हॉल्व्ह सिस्टिम खराब होते आणि रक्त व्हेन्समध्ये साचून राहते आणि व्हेरिकोज व्हेन्सची तीव्रता वाढते. थोडक्यात व्हेरिकोज व्हेन्समध्ये व्हेन्स अतिरिक्त प्रमाणात फुगतात आणि नागमोडी होतात.

आजार कोणामध्ये दिसून येतो?
ज्या लोकांमध्ये व्हेन्सच्या भिंती मुळातच कमजोर असतात, किंवा गरोदर स्त्रियांमध्ये त्या कमजोर होऊ शकतात. याव्यतिरिक्त ज्या व्यक्तींना ना हलता एका ठिकाणी उभे राहावे लागते (जसे ट्रॅफिक पोलिस, वॉचमन, परिचारिका, सर्जन), त्यांच्या पायाच्या व्हेन्समध्ये ‘व्हेरिकोसिटी’ दिसून येतात. आपण चालतो, तेव्हा पायांतील स्नायू कार्यरत असतात आणि त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते. काहीही न करता आपण एका जागी उभे राहतो, त्यावेळी रक्त पायांत (व्हेन्समध्ये) साठून राहते आणि प्रेशर वाढून व्हेरिकोज व्हेन्स दिसून येतात. साधारणपणे आपल्या पायाच्या व्हेन्स त्वचेच्या पृष्ठभागावर दिसून येत नाहीत; पण व्हेरिकोसिटीच्या प्रक्रियेला सुरुवात होते, तेव्हा त्या निळ्या- हिरव्या पुंजक्यांसारख्या दिसून येतात आणि वेळीच अटकाव ना केल्यास व्हेन्सच्या भिंतीमध्ये अपरिवर्तनीय बदल घडून येतात. हे दिसायला कुरूप दिसतातच; पण त्याव्यतिरिक्त यामध्ये त्वचेला होणारा रक्तपुरवठा बिघडतो, पायाला सूज येते, पुढे जाऊन पायाला न भरून येणाऱ्या जखमा होऊ शकतात.

उपचार
सगळ्यात उत्तम उपचार म्हणजे प्रतिबंध. ज्या व्यक्तींना आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात फारवेळ हालचाल न करता उभे राहावे लागते ते काही सोप्या गोष्टी करू शकतात. जसे, उभ्या उभ्या वजन एकेक पायावर घेणे, मधूनमधून चवड्यावर उभे राहणे (ज्यामुळे पायाचे स्नायू कार्यरत होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.) कामाची वेळ संपल्यावर घरी आल्यावर पाय उंचीवर ठेऊन झोपणे आणि पावलांची वर- खाली हालचाल करणे.
वरील टिप्स वापरून व्हेरिकोसिटी टाळता येऊ शकतात. याशिवाय, पोटऱ्यांच्या स्नायूंची ताकद वाढवल्याने पायातील रक्त अधिक ताकदीने हृदयाकडे पंप केले जाते. यासाठी एका पायावर उभे राहावे. तोल जाऊ नये म्हणून हलका आधार घेण्यास हरकत नाही; पण वजन मात्र पायावर असावे. आता वजन चवड्यावर घ्यावे. ही कृती १५-२० वेळा करावी. हळूहळू व्यायामाची वारंवारता वाढवत न्यावी.
ज्यांना व्हेरिकोसिटी झालेल्या आहेत, त्यांनी व्यायामाबरोबरच ‘प्रेशर गारमेंट’चा वापर करणे गरजेचे असते (बॅन्डेजेस किंवा स्टोकिंग्ज) यामुळे रक्तवाहिन्यांवर बाहेरून प्रेशर दिले जाते आणि त्यांच्या भिंतीवर अतिरिक्त ताण येत नाही. फुगलेल्या शिरा दिसू लागल्यास किंवा सूज/ जखम दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच. अशा वेळेस रक्तवाहिन्यांमधील प्रेशर कमी करून रक्ताभिसरण सुरळीत करावे लागते. यासाठी फिजिओथेरपिस्ट मसल स्टिम्युलेटर, न्यूमॅटिक कॉम्प्रेशनसारखी उपकरणे वापरतात आणि पोटरीच्या स्नायूंना ताकदीचे व्यायाम शिकवतात. जखम असल्यास त्याला संसर्ग होऊ नये आणि जखम भरून यावी यासाठी उपचार करावे लागतात.
पायांवरील फुगलेल्या शिरा दिसू लागल्या म्हणजे लगेच घाबरण्याची गरज नाही; पण त्याकडे दुर्लक्षही करू नये. नियमित चालणे, पायांच्या स्नायूंची हालचाल आणि योग्य व्यायाम यामुळे पायातील रक्ताभिसरणाला मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com