शहरभर पाणी आणि कोंडीच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

सलग दुसऱ्या दिवशी अचानक आलेल्या पावसाच्या तुफानाने शहराला झोडपले. रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडाली, तर काही ठिकाणी घरांमध्ये, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले.

पुणे - सलग दुसऱ्या दिवशी अचानक आलेल्या पावसाच्या तुफानाने शहराला झोडपले. रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात बुडाली, तर काही ठिकाणी घरांमध्ये, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. प्रारंभी वाहतुकीचा वेग मंदावला. नंतर हळूहळू वाढत गेलेल्या कोंडीने भरपावसात पुणेकरांचा घाम काढला. 

गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी झाली. दुपारी साडेचार वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. तास-दीड तास झालेल्या पावसामध्ये काही अंतरावरील दिसणेही मुश्‍किल झाले होते. त्यामुळे नागरिकांनी वाहनांचे दिवे लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला; तर दुचाकीस्वारांनी थांबणे पसंत केले. मुसळधारेमुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते. 

म्हात्रे पुलाजवळील रस्त्यांवर लावलेल्या काही कार, दुचाकी पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. काही भागांतील बैठी घरे, झोपडपट्ट्यांमधील घरे व सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. आंबिल ओढ्यासह शहरातील ओढ्या-नाल्यांच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यासह काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना  घडल्या. 

अर्ध्या तासाच्या अंतरासाठी दीड तास
शाळा, कार्यालये, कंपन्या सुटण्याच्या वेळेलाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडली. सायंकाळी सात वाजल्यानंतर पावसाचे पाणी ओसरू लागले. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत होण्यास सुरवात झाली. वाहतूक कोंडीमुळे घरी जाण्यासाठी अर्ध्या तासाच्या अंतरासाठी एक ते दीड तास लागल्याचे नागरिकांनी सांगितले.    

येथे झाली कोंडी
  नगर रस्ता 
  शिवाजी रस्ता, 
  जंगली महाराज रस्ता, 
  सिंहगड रस्ता 
  टिळक रस्ता, 
  शास्त्री रस्ता, 
  बाजीराव रस्ता  
  शंकरशेठ रस्ता, 
  भांडारकर रस्ता
  पुणे स्टेशन
  म्हात्रे पूल, 
  नदीपात्रातील रस्ता, 
  मॉडेल कॉलनी
  चित्तरंजन वाटिका परिसर 
  दीप बंगला चौक, 
  स्वारगेट 
  डेक्कन, 
  कर्वेनगर
  एरंडवणा, 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second day the sudden rain storm the pune city