पुणे : अकरावीच्या प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादीमधील ४९ हजार ८४८ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ७२६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे. त्यातील सात हजार ३९४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या फेरीतही नामांकित महाविद्यालयांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसून येते. दुसऱ्या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेतील नियमित दुसऱ्या फेरीतील निवड यादी जाहीर बुधवारी जाहीर झाली. दुसऱ्या फेरीत एकूण प्रवेश क्षमता ७२ हजार ८१४ इतकी होती. कला शाखेत एक हजार ७५०, वाणिज्य शाखेत सात हजार २७८, विज्ञान शाखेत नऊ हजार ३९८ आणि व्यावसायिक शिक्षण शाखेत ३०० विद्यार्थ्यांना निवड यादीत महाविद्यालय मिळाले आहे.
प्रवेश घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्यास, त्या अभावी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात येऊ नयेत. हमीपत्राद्वारे त्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा सदस्य सचिव डॉ. ज्योती परिहार यांनी सांगितले.
दुसऱ्या नियमित फेरीतील नामांकित महाविद्यालयांचा कट-ऑफ :
महाविद्यालय : विज्ञान : वाणिज्य : कला
- सिंबायोसिस महाविद्यालय : --- : ९३.२ टक्के : ९३ टक्के (इंग्रजी माध्यम)
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय : ८९.६ टक्के : --- :---
- लक्ष्मणराव आपटे प्रशाला : ९४.६ टक्के : ८३ टक्के : ---
- फर्ग्युसन महाविद्यालय : ९५ टक्के : --- : ९६.६ टक्के (इंग्रजी माध्यम)
- बीएमसीसी : --- : ९५.८ टक्के : ---
- स. प. महाविद्यालय : ९२.२ टक्के : ९१.४ टक्के : ९३ टक्के (इंग्रजी माध्यम)
- मॉडर्न महाविद्यालय : ९१.२ टक्के : ८८.६ टक्के : ८९.८ टक्के (इंग्रजी माध्यम)
पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :
पसंतीक्रम : विद्यार्थ्यांची संख्या
१ : ७,३९४
२ : ३,९१३
३ : २,२९०
४ : १,५०६
५ : १,१३६
प्रवेश प्रक्रियेचा तपशील :
कार्यवाही : कालावधी
- प्रवेश ऑनलाइन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे, प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे, प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीची वाट पाहणे : १२ जुलैपर्यंत (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)
- प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालये यांना वेळ : १२ जुलै (रात्री आठ वाजेपर्यंत)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.