...या वाहन मालकाने किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले पहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

येथे तपासा ऑनलाइन दंड  
वाहतूक पोलिसांनी केलेला दंड तपासण्यासाठी 
https://mahatrafficechallan.gov.in किंवा mahatrafficapp या मोबाईल ॲपवर माहिती तपासता येणार आहे. ही माहिती तपासण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इंजिन क्रमांक किंवा चॅसिस क्रमांकाची शेवटचे चार आकडे गरजेचे असतात.

पुणे - सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून त्याचा दंड न भरणाऱ्या शंभर वाहन मालकांची यादी पुणे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पहिला क्रमांक मिळणाऱ्या बेशिस्त वाहन मालकाने तब्बल १०८ वेळा वाहतुकीचे नियम मोडले असून, वाहतूक पोलिसांनी त्याला ४२ हजार ३०० रुपयांचा ठोठावला आहे, तर सर्वांत मोठी दंडाची रक्कम ७० हजार रुपये आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१०८ वेळ नियमभंग केलेले वाहन हे बिबवेवाडी येथे राहणारे सोनई अमृतलाल भौरमल यांच्या नावावर आहे, तर रणधीर सिंग यांच्या नावावर असलेल्या वाहनाला ७० हजार, तर कमल एम. राजपाल यांच्या नावावरील वाहनास ५३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यांनी अनुक्रमे ७० आणि ५३ वेळा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. दंड झालेल्या या वाहनमालकांनी अद्याप एक रुपयांचादेखील दंड भरलेले नाही, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. या यादीत ‘सीसीटीव्ही’ आणि ‘ई-चलन डिव्हाईसच्या माध्यमातून संबंधितांवर केलेल्या कारवाईचा समावेश असून, सर्वाधिक १०८ चलन असलेल्या वाहनचालकांपासून सर्वांत कमी ४४ चलन असलेल्या चालकांचा त्यात समावेश आहे.

शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून नियमित प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहनचालकांकडून करण्यात येणाऱ्या नियमभंगांमुळेच अनेक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लागून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहतूक शाखेतर्फे ई-चलन मशिनद्वारे आणि सीसीटीव्हीद्वारे कारवाई करण्यात येते. या कारवाईची माहिती संबंधितांना एसएमएसद्वारे पाठविली जाते. त्यांनी तो दंड ऑनलाइन भरणे अपेक्षित असते; परंतु बऱ्याचदा वाहनचालकांचा कल दंड न भरण्याकडे असतो. अशा प्रकारे दंड प्रलंबित असलेल्या वाहन चालकांची संख्या मोठी आहे. हा दंड वसूल करण्यासाठी सर्वाधिक चलन प्रलंबित असलेल्या शंभर जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See how many times this vehicle owner broke traffic rules