Pune News : विक्रेते पदपथांवर; पादचारी रस्त्यांवर

महापालिकेचा अतिक्रमण विभाग ढिम्मच; कारवाईचा केवळ देखावा.
Sellers on Footpath
Sellers on Footpathsakal

पुणे - ‘डोक्‍यावर ऊन तळपत असताना शनिपार चौकातील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या इमारतीसमोरून किमान सावली मिळेल, सुरक्षित जाता येईल म्हणून पदपथावरून जाण्याचा प्रयत्न केला; पण इथे महापालिकेने पदपथ पादचाऱ्यांसाठी केले आहेत की विक्रेत्यांच्या स्टॉलसाठी आहेत, हा प्रश्‍न पडला आहे.

रस्त्यावर इतकी वाहने असतात की, जीव धोक्‍यात घालून आम्ही इथे खरेदीसाठी का येऊ?’ चेतना भोसले यांच्या या प्रश्‍नांतून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे वाभाडे निघाले आहेत. शहरातील बहुतांश पदपथांवर अनधिकृत विक्रेत्यांनी अक्षरशः ‘ताबा’ मिळवल्याची स्थिती असूनही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

लग्नसोहळा, सण, उत्सव, समारंभांमुळे पुणे जिल्ह्यासह शहराच्या कानाकोपऱ्यातील नागरिक खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, शनिपार चौक, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. काही दिवसांतच शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी मध्यवर्ती भागात गर्दी वाढणार आहे.

असे असताना नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, स्वारगेट, महात्मा गांधी रस्ता अशा बहुतांश मुख्य रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमणांनी ‘हाउसफुल्ल’ झाले आहेत. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहनांच्या गर्दीतून चालण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.

बाजीराव रस्त्याची कहाणी

काही वर्षांपूर्वी संपूर्ण बाजीराव रस्त्यावरील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित होते. मात्र मागील काही वर्षांपासून शनिपार चौकापासून ते शनिवारवाड्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तुळशीबागेतील महाराष्ट्र बॅंकेसमोरील पदपथावर अक्षरशः अनधिकृत विक्रेत्यांनी विकत घेतल्याप्रमाणे अतिक्रमण केले आहे.

वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, खरेदीसाठी येणाऱ्या महिला, तरुणींवर रस्त्यावरून चालण्याची वेळ येत आहे. याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी वाहनाची धडक बसून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. हुजूरपागा व नूमवि शाळेसमोरील रस्ता, अप्पा बळवंत चौक ते शनिवारवाड्यार्पंत दोन्ही बाजूंना काही महिन्यांपासून अचानक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाड्या लावल्या जात आहेत.

लक्ष्मी रस्त्यावरही अतिक्रमण

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरापासून ते मंडईतील गोटीराम भय्या चौकापर्यंत दोन्ही बाजूंचे पदपथ अतिक्रमणांनी व्यापले आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दरवेळी तात्पुरती कारवाई केली जाते. काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होऊन जाते.

लक्ष्मी रस्त्यावरील पदपथांवरूनही चालताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. शनिवार, रविवार, सणांच्या दिवशी तर नागरिकांची गर्दी रस्त्यावरूनच जाताना दिसते. फर्ग्युसन महाविद्यालय, महात्मा गांधी रस्ता या रस्त्यांसह वाकडेवाडी येथील एसटी स्थानक परिसरातही किरकोळ विक्रेत्यांकडून पदपथाचा खासगी कारणांसाठी वापर केला जात आहे.

दुकानदारांकडूनही पादचाऱ्यांचीच अडवणूक

प्रमुख रस्त्यांवरील दुकानदारांकडून त्यांचे बोर्ड, फ्लेक्‍स, प्लॅस्टिक बॉक्‍स पदपथांवर टाकून पादचाऱ्यांचीच अडवणूक केली जाते. काही दुकानदारांकडून स्वतःचे स्टॉल पदपथांवर थाटले जातात, तर काहींकडून दुकानांसमोरील पदपथावरील जागेसाठी छोट्या विक्रेत्यांकडून पैसे घेतले जातात. मात्र, या सगळ्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत असून, अपघातही घडू शकतो.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पदपथावरील विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र, सध्या अतिक्रमण विभागाकडील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. निवडणूक झाल्यानंतर अतिक्रमण विभाग, पथ विभाग, बांधकाम विभाग यांच्याकडून पदपथावरील अतिक्रमणांवर संयुक्तपणे कडक कारवाई केली जाईल.

- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग

चांगल्या वस्तू मिळत असल्याने आम्ही पुण्यात खरेदीसाठी येतो. पण इथे पदपथावरून चालता येत नाही, वाहने पार्किंग करता येत नाहीत. रस्त्यावरून चालताना कधी एखादी बस धडकेल, याची भीती असते. ग्राहकांमुळे दुकानदार व महापालिकेला पैसे मिळतात. मग त्यांची अशी गैरसोय का?

- स्वाती पांडे, नोकरदार

महापालिकेने पादचाऱ्यांसाठी तयार केलेल्या पदपथांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून याबाबत तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com