Water Tax : ज्येष्ठ नागरिकाला धाडली पावणे अकरा लाखाची पाणीपट्टी

आर्थिक वर्ष संपत आलेले असताना महापालिकेकडून उत्पन्न वाढीसाठी खटाटोप केला जात आहे.
water tax
water taxsakal
Updated on

पुणे - आर्थिक वर्ष संपत आलेले असताना महापालिकेकडून उत्पन्न वाढीसाठी खटाटोप केला जात आहे. अशातच शनिवार पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाला महापालिकेने चुकून तब्बल १० लाख ७६ हजार ५९ रुपयांचे बिल पाठविल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. या बनावट बिलाच्या विरोधात संबंधित ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केली असून, त्यांना अजून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

शनिवार पेठेत राहणारे ७५ वर्षाच्या गोविंद गोरे यांना काही दिवसांपूर्वी महापालिकेतर्फे थकीत पाणी पट्टी भरण्याचा मेसेज आला. दरवर्षीची पाणी पट्टी भरलेली असताना ही थकबाकी कशाची असा प्रश्‍न त्यांना पडला. त्यामुळे त्यांनी महापालिकेतर्फे आलेला हा मेसेज उघडून पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यात तब्बल पावणे अकरा लाख रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली होती.

या बिलाची त्यांनी तपासणी केली असताना त्यांना हे बिल क्रमांक त्यांचे नसल्याचे लक्षात आले पण बिल काढताना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकण्यात आला असल्याने गोरे यांच्या नावाने थकबाकी दाखविण्यात आली आहे. या बनावट बिलाचा पत्ता हा शनिवार पेठ नवा पूल असा आहे तर गोरे यांचा पत्ता बावडेकर टेकाडी शनिवार पेठ असा आहे.

एवढी मोठी थकबाकीची रक्कम पाहून गोरे यांचे डोळे फिरले. त्यांनी त्याविरोधात महापालिका आयुक्तांसह पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. बनावट बिल तयार करून मला पावणे अकरा लाखाची थकबाकी भरण्याची नोटीस पाठवली आहे. हे बिल रद्द करून मला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोरे म्हणाले, ‘मी महापालिकेत तक्रार केली आहे, पण मला ठोस काहीच सांगण्यात आले नाही. आम्ही बिल दुरुस्त करू असे मोघम उत्तर दिले जात आहे. पण एवढ्या मोठ्या रक्कमेची थकबाकी बघून माझा रक्तदाब वाढला होता. काही बेर वाईट झाले तर महापालिका जबाबदारी घेणार का?’. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणीही गोरे यांनी केली आहे.

यासंदर्भात मीटर वाचक संजय शिंदे म्हणाले, गोरे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. चुकून त्यांचा मोबाईल क्रमांक बिलावर पडल्याने त्यांना हा मेसेज गेला आहे. ही चूक सुधारली जाईल.

दरम्यान, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com