

सिंहगड रस्ता, ता. २८ : ‘‘ज्येष्ठ नागरिकांनी केवळ आरोग्याचीच काळजी घेऊ नये, तर जास्तीत जास्त मित्र जोडून सामाजिक संवाद वाढवावा. मनात कुणाबद्दलही वाईट विचार न ठेवता सकारात्मक जीवन जगावे,’’ असा सल्ला डॉ. हिरेन निरगुडकर यांनी दिला.
सनसिटी रस्ता ज्येष्ठ नागरिक संघाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनियुक्त कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना, ‘हा माझ्या घरातील सत्कार आहे,’ अशा शब्दांत निफाडकर यांनी भावना व्यक्त करत संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी अनिता निफाडकर, अनंत रानडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नेहा खरे यांच्या गणपती स्तवनाने झाली. संस्थापक अध्यक्ष सुरेश कट्टे यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. या वेळी ८० वर्षांवरील ज्येष्ठ सभासदांना भेट देऊन गौरविले. सचिव शिवदास साळुंके यांनी देणगीदारांबद्दल आभार मानले. मीनल हसबनीस यांनी सूत्रसंचालन केले. तर मिलिंद नाईक यांनी आभार मानले. वासंती माजगावकर यांच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.