ज्येष्ठ समीक्षक-लेखक शंकर सारडा यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

आज दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्‍चात त्यांचे नेत्र दान करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा (वय ८३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते पार्किसन्सने आजारी होते. आज दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्‍चात त्यांचे नेत्र दान करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

महाबळेश्‍वर येथे जन्मलेले सारडा यांनी पत्रकारिता, समीक्षा, बालसाहित्य, लेखन अशा क्षेत्रात मुशाफिरी केली. लहान वयातच त्यांना लिखाणाची आवड होती. त्या वेळेपासून त्यांचे लिखाण प्रसिद्ध व्हायला सुरवात झाली होती. त्यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत झाले. बालसन्मित्र बाललेखांचे संपादन, साधना साप्ताहिकाचे सहसंपादक, तसेच विविध दैनिकांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले. महाबळेश्वर येथे विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन, अ. भा. मराठी साहित्य संमेलन (सातारा), पहिले अभिजात साहित्य संमेलन (सातारा), अ. भा.बालकुमार साहित्य संमेलनाचे (सावंतवाडी) अध्यक्ष, वेदगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, अंकुर साहित्य संमेलनांचे आयोजनात सहभागी आणि महत्त्वाची पदेही त्यांनी भूषविली.

चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिपऱ्या आणि रत्नी, गुराख्याचा पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी,  नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दुःख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती, हे बालसाहित्य तसेच समीक्षा, पुस्तकांचे जग, दूरदेशीचे प्रतिभावंत, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलानाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र) आणि कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था आणि सातारा ग्रंथमहोत्सव समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior critic, author Shankar Sarda dies at 83 years of age