

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे
शेअर बाजारात सलग दुसरी घसरण
‘सेन्सेक्स’ ५१६ अंशांनी कोसळला
मुंबई, ता. ८ ः पश्चिम आशियामध्ये नव्याने निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे ऊर्जेच्या पुरवठ्याबाबतच्या चिंता पुन्हा बळावल्याने गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला; परिणामी, आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली.
परदेशी निधी सतत काढून घेतला जात असल्यामुळे आणि जागतिक बाजारांमधील कमकुवत कल यामुळे बाजारातील घसरणीच्या प्रवृत्तीला आणखीच बळ मिळाले. ‘सेन्सेक्स’ ५१६.३३ अंशांनी कोसळून ७७,३२८.१९ अंशांवर स्थिरावला, तर ‘निफ्टी’ १५०.५० अंशांनी, म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी घसरला आणि २४,१७६.१५ अंशांवर बंद झाला. दिवसभरात ‘सेन्सेक्स’ ६९८.०९ अंशांनी घसरून ७७,१४६.४३ अंशांच्या पातळीवरदेखील पोहोचला होता.
‘सेन्सेक्स’मध्ये स्टेट बँकेचे मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर, बँकेचा शेअर ६.६२ टक्क्यांनी कोसळला. एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअरही घसरले. चांगल्या निकालांमुळे टायटनचा शेअर ४.७६ टक्क्यांनी वधारला. एशियन पेंट्स, अदानी पोर्ट, इन्फोसिस आणि एचसीएल टेक हे शेअर वधारले.
कोट
होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा लष्करी हालचाली झाल्यामुळे बाजारात जोखीम टाळण्याची स्थिती दिसून आली; यामुळे युद्धविरामाच्या आशा क्षीण झाल्या आणि गुंतवणूकदारांनी नफावसुली सुरू केली. तरीही, कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास स्थिर असणे आणि अमेरिकेच्या १०-वर्षीय रोख्यांवरील परताव्याचे दर नियंत्रणात असणे, यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरणाला आणि रुपयाला आधार मिळत आहे. पुढील वाटचाल थोडी खडतर असली, तरी संभाव्य राजनैतिक तोडग्याबाबतचा आशावाद अजूनही कायम आहे.
- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स