पुणे जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील सात जणांची भीमा नदीत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Pawar and Sangita Pawar

पारगाव (ता. दौंड ) येथे भीमा नदीपात्रात आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. सातही जण एकाच कुटुंबातील असल्याने खळबळ उडाली आहे.

Crime News : पुणे जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील सात जणांची भीमा नदीत आत्महत्या

केडगाव, जि. पुणे - पारगाव (ता. दौंड ) येथे भीमा नदीपात्रात आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. सातही जण एकाच कुटुंबातील असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पाच पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी दाखल झाली आहेत. पीएमआरडीएच्या शोध पथकाने तीन मुलांचे मृतदेह शोधून काढले.

मोहन उत्तम पवार (वय ४५) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे (वय-२८), राणी शाम फुलवरे (वय-२४) रितेश उर्फ भैय्या (वय-७), छोटू शाम फुलवरे (वय-५) कृष्णा शाम फुलवरे (वय-३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद ) हे सर्व जण एक वर्षापासून निघोज (ता. पारनेर) येथे मजुरीसाठी आले होते. पवार पती पत्नी हे फुलवरे यांचे सासू सासरे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पाच दिवसात टप्प्याटप्याने चार मृतदेह सापडले. बुधवारी (ता. १८) पारगाव येथील मच्छीमारांना एका महिलाचा पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर रविवारपर्यंत दोन पुरूष व एका महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

राणी फुलवरे यांच्या कपड्यांमध्ये मोबाईल व सोने खरेदीची पावती मिळाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता. त्यांच्या बरोबर आणखी तीन मुल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे काल सायंकाळी वाघोली येथील पीएमआरडीएचे शोध पथक काल सायंकाळी पाचारण करण्यात आले. या पथकाने तीनही मुलांचे मृतदेह आज शोधून काढले. शेवटचा मृतदेह दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. एक मुलगा पारगावच्या पुर्वेस सापडला तर दोन मुलांचे मृतदेह नानगावच्या रासाईदेवी मंदिराजवळ सापडले. तीघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले. यांच्याकडे काही वाहन असल्याची शक्यता गृहीत धरून यवत पोलिस भीमा नदी पात्रात वाहनाचा शोध घेत होते.

नदीतील जलपर्णीमुळे शोधकार्यात अडथळा आला. पवार व फुलवरे कुटुंब १७ जानेवारीला निघोजवरून निघाले होते. १८ जानेवारीला पहिला मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. यवत पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे म्हणाले, मृतदेहांच्या अंगावर कुठल्याही जखमा नाहीत. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी दसत आहे. गुन्ह्याच्या बाबतीतील सर्व शक्यता आम्ही पडताळून पहात आहोत.

टॅग्स :punecrimeBhima River