

सात तालुक्यांचा गाडा
अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे
सातारा, ता. २३ : जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वाची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकारी पदांपैकी जिल्ह्यात तब्बल सात पदांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. सात तालुक्यांचा शिक्षणाचा गाडा अतिरिक्त व्यवस्थेवर चालत असताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कशी, असा प्रश्न पालक आणि शिक्षकांकडून उपस्थित होत आहे.
सातारा, खंडाळा, पाटण, खटाव, माण, फलटण आणि कोरेगाव या सात तालुक्यांत पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नाहीत. त्यामुळे या तालुक्यांचा शैक्षणिक कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. दुसरीकडे कऱ्हाड, वाई, जावळी आणि महाबळेश्वर येथे पूर्णवेळ अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल निम्म्याहून अधिक तालुके प्रभारी व्यवस्थेवर असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, गुणवत्ता सुधारणा उपक्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळांची तपासणी, पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न आणि शैक्षणिक नियोजन यावर याचा थेट परिणाम होत आहे. प्रभारी अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून तालुक्याच्या शैक्षणिक प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष देणे कठीण बनले आहे. प्रभारीपदामुळे निर्णयक्षमतेलाही मर्यादा येतात.
.....
चौकट
ठोस निर्णय घेण्यास अडचणी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रभारी कार्यभार असल्याने ठोस निर्णय घेण्याऐवजी ‘दिवस ढकलण्याची’ मानसिकता असल्याचे दिसून येते. शिक्षणाच्या गुणवत्तेशी थेट संबंधित पदेच रिक्त ठेवून प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये. शासनाने तातडीने सर्व तालुक्यांना पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी देऊन शिक्षण विभागाला सक्षम करावे, अशी मागणी होत आहे.
.........
सहा महिन्यांपासून
अतिरिक्त कार्यभार
जिल्ह्यात सातारा, पाटणसह अनेक ठिकाणची तालुका गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. महिना, दीड महिना अतिरिक्तपदाचा कार्यभार सोपविल्यास म्हणाव्या तेवढ्या अडचणी येणार नाहीत. मात्र, सहा ते सात महिन्यांपासून पदे प्रभारी राहिल्यास शैक्षणिक गुणवत्ता आणि योजना राबविण्यास अडथळे येणे साहजिकच आहे.
............................
या तालुक्यात प्रभारी कार्यभार : सातारा, खंडाळा, पाटण, खटाव, माण, फलटण, कोरेगाव
पूर्णवेळ अधिकारी : कऱ्हाड, वाई, जावळी, महाबळेश्वर
................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.