दोन महिन्यांत सात हजार कोरोना रुग्ण ठणठणीत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

विमाननगर कोविड केअर सेंटरमधील डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांचे योगदान 

 

पुणे (रामवाडी) : कोरोना रुग्णाला प्रथम मानसिक आधार देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे, पोषक आहार वेळेवर देणे, सकारात्मक व आनंदी अशा वातावरणामुळे विमाननगर कोविड केअर सेंटरमधून दोन महिन्यांत तब्बल 7018 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे होऊन घरी परतले. 

महापालिकेकडून विमाननगर भागातील एसआरए स्कीम येथे 16 जुलै रोजी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. अकरा मजली अशा तीन इमारतींमधील प्रत्येक खोलीमध्ये पाच रुग्णांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. 
खराडी, वडगावशेरी, कल्याणीनगर, विमाननगर, लोहगाव, येरवडा तसेच शहराच्या विविध भागांतून कोरोना बाधित रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. या कोविड सेंटरला सेवाभावी संस्था, इस्कॉन आणि भारतीय जैन संघटना यांच्याकडून मदतीचा हात मिळत असल्याची माहिती नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी दिली. 
सेंटरच्या प्रमुख डॉ. संगीता भारती, डॉ. अमित वाडकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील यादव, राजेश बनकर, भारतीय जैन 
संघटनेचे एस आर पवार, संतोष पवार, सुरेश गायकवाड यांच्यासह महापालिकेचे शंकर दुदुस्कर, दत्तात्रेय चव्हाण, अशोक सांगळे, प्रशांत मोरे, तुळशीदास भांडारकोटे, विठ्ठल साबळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. 

माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मी खचून गेलो होतो, त्यावेळी मनोधैर्य देण्याचे काम येथील डॉक्‍टरांनी केले. योग्य उपचार व तत्पर सेवेमुळे मी ठणठणीत बरा झालो. या सर्वांचे श्रेय डॉक्‍टरांपासुन ते रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहे. या दहा दिवसांत सर्वांशी आपुलकीचे, मैत्रीचे नाते जोडले गेले. - निखिल गायकवाड, कोरोनावर मात केलेले रुग्ण 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven thousan corona patients healed in two months