अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड गावच्या हद्दीत घडली.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला अटक

किरकटवाडी - अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड गावच्या हद्दीत घडली आहे. संबंधित तरुणाने अगोदर प्रेमाचे नाटक करत मुलीकडून वारंवार पैसेही उकळल्याचे समोर आले असून त्याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला अटकही करण्यात आली आहे.

शिवानंद वाकोडे (वय 21, रा. शिवणे, पुणे.) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी आरोपी वाकोडे याने नांदेड येथील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी मुलीकडून पैसे उकळले. एवढेच नाही तर स्वतःला दुचाकी घेण्यासाठी मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैनही काढून घेतली.

आरोपीने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला त्रास देण्यास सुरुवात केल्यानंतर तिने पालकांना याबाबत सांगितले. मुलीच्या तक्रारीवरून शिवानंद वाकोडे याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.

पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे

अल्पवयीन मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या वागण्यातील बदल पालकांनी वेळीच ओळखायला हवा. तसेच टवाळखोर तरुण मुलींना त्रास देत असतील तर दुर्लक्ष न करता पोलीसांशी संपर्क साधावा. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.