

शाहूपुरी चौकातील १८ गाळ्यांवर जेसीबीच्या साह्याने कारवाई
रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम; सहा गाळेधारक न्यायालयात
सातारा, ता. १९ ः शाहूपुरी चौकातील होणारी वाहतूक कोंडी सोडवून नियोजित रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पालिकेने १८ गाळेधारकांच्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साह्याने कारवाई केली. या चौकातील सहा गाळेधारकांनी अतिक्रमण हटावप्रश्नी न्यायालयात दाद मागितली असून, त्यावरील सुनावणी शुक्रवारी (ता. २१) होणार असल्याची माहिती गाळेधारकांपैकी एकाने दिली.
आंबेदरे, माळवाडीसह, शाहूपुरी अंतर्गत भागातील वसाहतींना जोडणारा शाहूपुरी चौक हा मुख्य भाग आहे. या भाग पूर्वी शाहूपुरीत ग्रामपंचायत होती. मागील काही वर्षांपासून हा भाग सातारा पालिकेच्या हद्दीत आला आहे. दिवसभरात या ठिकाणाहून हजारो वाहनांची ये-जा होत असते. या चौकातील अतिक्रमणे, अस्ताव्यस्त वाहने यामुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. त्यातच या चौकालगत सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भाजी मंडई भरत असते. येथे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यातच उभी राहात असल्याने सायंकाळच्या सुमारास छोटे मोठे अपघात होण्यासह वादावादीच्या घटना रोज घडत असतात. यामुळे या चौकातील अतिक्रमणे काढण्यासह रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून होत होती.
याबाबत सातत्याने ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. स्थानिकांसह नगरसेवकांनीही प्रशासनास पाठबळ दिल्याने आज मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह पालिका प्रशासनाने चौकाची पाहणी करत रुंदीकरणासह अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू केली होती. यासाठीच्या नोटिसा पालिकेने संबंधितांना बजावल्या होत्या. यानंतर काही जण न्यायालयात गेले. यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. न्यायालयात गेलेल्यांच्या मिळकती सोडून उर्वरित मिळकतींवरील अतिक्रमणे हटविण्यास आज प्रारंभ झाला. या कारवाईसाठी स्वतः मुख्याधिकारी जळक हे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या २५ जणांच्या पथकासह शाहूपुरी चौकात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गाळाधारकांच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कुमकही चौकात कार्यरत होती.
चौकट
व्यावसायिकांच्या अश्रूंचा बांध फुटला
आजच्या मोहिमेत होर्डिंग, गॅरेज, खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी विक्रेते, किराणा माल दुकान, हॉटेल्स, सलून, बांधकाम साहित्य दुकान, चिकन, मटण विक्रीचे दुकान, मोबाईल शॉपी, पंक्चर दुकान आदींवर कारवाई करण्यात आली. यावेळी बहुतांश जणांनी ३५ ते ५० वर्षे शाहूपुरी चौकात व्यवसाय केल्याने कारवाईदरम्यान अश्रूंचा बांध फुटला. पालिका अधिकाऱ्यांनीही सर्वांना सहकार्य करत त्यांचे साहित्य हलविण्यास मदत करत स्वाधीन केले.
---------------------------
PNE26W43458 आणि PNE26W43459
सातारा ः पालिकेने बुधवारी शाहूपुरी चौकात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. त्यावेळी जेसीबीच्या साह्याने भिंती पाडण्यात आल्या. दुसऱ्या छायाचित्रात अवधी देऊनही सहकार्य न करणाऱ्यांची कानउघाडणी करताना पालिका अधिकारी.
(प्रमोद इंगळे ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.