esakal | ‘आळशी पॅटर्न’
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘आळशी पॅटर्न’

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘‘शामराव, तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला येता का झोपायला येता? लोकांसमोर टेबलवर डोकं ठेवून चक्क झोपता!’’ ‘‘साहेब, खुर्चीवर डोकं ठेवून झोपलं की मान अवघडते. त्यामुळे टेबलवर डोकं ठेवून झोपावं लागतं.’’

‘‘त्यापेक्षा तुम्ही स्टोअररूममध्ये का नाही झोपत’’? साहेबांनी असं विचारल्यावर शामरावांना गहिवरून आलं. हल्ली कोणता अधिकारी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या झोपेची एवढी काळजी घेतो. मानदुखी व पाठदुखीचा त्रास होऊ नये म्हणून स्टोअररूममध्ये झोपा, असा सल्ला कोणता वरिष्ठ देईल? असे विचार शामरावांच्या मनात आले.

‘‘साहेब, आतापर्यंत तिथंच झोपत होतो पण तेथील सोफ्यावरील गादी खराब झाली आहे. तेवढी बदलण्याची व्यवस्था केलीत तर बरं होईल.’’ शामरावांनी विनयानं म्हटलं. त्यावर साहेबांचा संताप अनावर झाला. ‘‘तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटू द्या. या वागणुकीबद्दल मी मेमो देतोय. तातडीने खुलासा करा.’’ ‘‘साहेब, पुढच्या आठवड्यात खुलासा देतो. आता मला खूप कंटाळा आलाय.’’ असे म्हणून त्यांनी जांभया द्यायला सुरवात केली. आपण थोडावेळा शामरावांना येथं थांबवलं तर ते येथंच झोपतील की काय, अशी भीती वाटल्याने साहेबांनी त्यांना कडक भाषेत समज देत केबिनबाहेर घालवलं.

शामरावांचा हा ‘आळशी पॅटर्न’ फार प्रसिद्ध आहे. नुसत्या कामाच्या विचारानेही त्यांना थकवा येतो. त्यामुळे हा थकवा घालवण्यासाठी त्यांना विश्रांतीची गरज भासते. मात्र, विश्रांतीसाठी दरवेळी स्टोअररूममध्ये वा कॅंटिनला जाण्याचाही त्यांना कंटाळा यायचा. मग ते बसल्या जागीच डुलक्या घ्यायचे. मात्र, त्यांची ही झोप अनेकांच्या ‘डोळ्यांवर’ यायची. त्यामुळे ही मंडळी साहेबांकडे तक्रार करायची. ‘साहेबांनी बोलावलंय’ असं शिपायानं म्हटल्यावर शामरावांना त्यांच्या केबिनमध्ये जायचाही कंटाळा यायचा. ‘‘साहेबांना सांगा, तुम्हीच या माझ्या टेबलकडे. वाटल्यास मला येथेच झापा,’’ असं म्हणायची त्यांची इच्छा व्हायची. पण एवढं बोलण्याचाही त्यांना कंटाळा यायचा. मग ते झोप वगैरे पूर्ण झाल्यानंतरच साहेबांच्या केबिनमध्ये जायचे. आजही तसंच घडलं होतं. साहेबांनी एवढं झापल्यानंतर पुन्हा त्यांना थकवा जाणवू लागला. मग त्यांनी ‘काऊंटर क्लोज्ड’ असा बोर्ड लावून, टेबलवर डोकं ठेवून ते झोपले.

‘आजचे काम उद्यावर ढकला,’ या प. पू. आळशीमहाराजांच्या वचनाचा त्यांच्यावर फार प्रभाव आहे. लहानपणापासूनच

शामरावांचा स्वभाव आळशी आहे. दुसऱ्यांशी बोलायचा तर त्यांना जाम कंटाळा येतो. त्यामुळेच जन्मल्यानंतर ‘पहिले वर्षभर ते कोणाशी एक शब्दही बोलले नाहीत.’ जी गोष्ट बोलण्याची, तीच गोष्ट चालण्याची. पहिले दीड वर्ष चालण्याचा त्यांना कंटाळा आल्याने ते रांगत-रांगत हव्या त्या ठिकाणी जात असत.

त्यांचे लग्नही उशीरा झाले. त्यामागेही ‘मुलगी बघायला उद्या जाऊ,’ हेच कारण होते. ‘आळशी माणसाशी लग्न करा, तो तुम्हाला सोडून जायचा पण कंटाळा करील,’ या विचारावर विश्‍वास असणाऱ्या मुलीशी त्यांचे सूत जुळले.

ऑफिसमध्ये आज तासभर उशिरा पोचल्याने शामरावांना थकवा आला. त्यामुळे बॅग टेबलवर ठेवून, ते कॅटिंनमध्ये गेले. तिथे नाश्‍ता केल्याने त्यांच्या डोळ्यांवर धुंदी आली पण कॅटिंनमध्ये झोपणे बरोबर दिसणार नाही, असे समजून ते पुन्हा जाग्यावर आले. थोड्यावेळाने साहेब स्वतःच शामरावांकडे आले व त्यांच्या हाती प्रमोशनचे पत्र दिले. ‘‘शामराव अभिनंदन ! तुमची कामातील गती व अनुभवाचा विचार करून, तक्रार केंद्राच्या प्रमुखपदी तुम्हाला नेमलंय.’’ पण साहेबांना धन्यवाद म्हणायचाही शामरावांनी कंटाळा केला. दुसऱ्या दिवसांपासून त्यांनी नवीन पदाचा कार्यभार स्वीकारला. आता सर्वसामान्य लोकं त्यांच्या तक्रारी शामरावांपुढे मांडतात. पण अर्धवट झोपेत असणारे शामराव त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यासारखे करतात. कोणाच्याही तक्रारीचे निवारण होत नाही. मात्र, समोरची व्यक्ती ‘वस्सकन’ अंगावर येण्याऐवजी किमान आपलं म्हणणं तरी ऐकून घेतेय, याचं समाधान सर्वसामान्य लोकांना आहे.

loading image
go to top